बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील बिडी येथे एका वृद्ध दाम्पत्याचा मृतदेह गुरुवारी (28 मार्च) संध्याकाळी आढळून आला. ख्रिश्चन गल्ली, बिडी येथील रहिवासी डायगो संतान नाझरेथ (वय 83) आणि त्यांची पत्नी फ्लेविया डायगो नाझरेथ (वय 80) हे शेजाऱ्यांना रात्री आठ वाजता मृत अवस्थेत सापडले. श्रीमती फ्लेविया घरात मृतावस्थेत आढळल्या, तर डायगो घराबाहेरील पाण्याच्या टाकीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी तातडीने नंदगड पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता, इंग्रजीत लिहिलेली एक सुसाईड नोट सापडली.
सदर चिठ्ठीत डायगो नाझरेथ यांनी जानेवारी महिन्यापासून एका भामट्याने त्यांना धमक्या दिल्याचे नमूद केले आहे. तो स्वतःला दिल्लीतील बीएसएनएलचा उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगत होता आणि डायगो यांच्या सिमकार्डचा गैरवापर झाल्याचा आरोप करून त्यांना “डिजिटली अटक” होईल, अशी भीती घालण्यात आली होती.
सातत्याने पैशांची मागणी करून फसवणूक करणाऱ्याने या दाम्पत्याकडून पाच ते सहा लाख रुपये उकळल्याची शक्यता आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. डायगो यांनी गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून घेतले, मात्र जीव न गेल्याने त्यांनी पाण्याच्या टाकीत उडी मारली असावी. तर त्यांच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.
मृतदेह खानापूर येथील सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले असून, अधिकाऱ्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी मोबाईल, एक धारदार हत्यार आणि सुसाईड नोट ताब्यात घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
डायगो नाझरेथ हे महाराष्ट्र सरकारच्या सचिवालयातून निवृत्त झाले होते. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी आपले मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयाला दान करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, ग्रामस्थ व नातेवाईकांनी त्यांचे मृतदेह बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलला दान केले आहेत.