बेळगाव लाईव्ह :गुढीपाडवा अर्थात हिंदू नववर्षाच्या पहिल्या सोमवार निमित्त दक्षिण काशी श्री कपिलेश्वर मंदिर येथे आज सकाळी खास खिरीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले, ज्याचा सुमारे 10 हजार भाविकांनी लाभ घेतला.
श्री कपिलेश्वर मंदिर आवारात खिरीच्या प्रसादाचे वाटप करण्यासाठी खास स्टॉल उभारण्यात आले होते. या स्टॉल्सवर प्रसाद घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.
या संदर्भात श्री कपिलेश्वर मंदिर येथे बेळगाव लाईव्हशी बोलताना मंदिराचे पदाधिकारी अभिजीत चव्हाण यांनी सर्वप्रथम श्री कपिलेश्वर मंदिरातर्फे शहरवासीयांना हिंदू नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, आमच्या समस्त शिवभक्त आणि मंदिरातील सेवेकऱ्यांनी भेटी स्वरूप दोन मोठ्या काहिली दिल्या आहेत.
हिंदू नववर्ष व चैत्र महिन्याच्या पहिल्या सोमवार याचे औचित्य साधून या काहीलींचे उद्घाटन करण्याचा आम्ही निर्णय घेतला.
त्यानुसार दोन्ही काहीलींमध्ये आज सुमारे 10 हजार भाविकांना प्रसादाच्या स्वरूपात पुरेल इतकी खीर तयार करून तिचे वाटप करण्यात येत आहे असे सांगून मंदिराच्या आवारात सकाळी 9 वाजल्यापासून सुरू असलेले हे प्रसाद वाटप खीर संपेपर्यंत अखंड सुरू राहणार आहे, अशी माहिती चव्हाण यांनी दिली.