बेळगाव लाईव्ह : कंग्राळी खुर्द येथील सागर नगर भागातील नागरिकांनी अतिक्रमणाविरोधात आवाज उठवत रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले असून, ग्रामपंचायतीच्या निर्णयाची नागरिक प्रतीक्षा करत आहेत.
कंग्राळी खुर्द गावातील सागर नगर भागातील नागरिकांनी ज्योतिर्लिंग गल्लीत अतिक्रमण होत असल्याचा आरोप करत रास्ता रोको आंदोलन छेडले. या ठिकाणी केवळ पाच फुटांचा रस्ता असून, एका घरमालकाने अतिक्रमण करत बांधकाम सुरू केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत ग्रामपंचायतीला निवेदन देऊन देखील कोणतीही कारवाई न झाल्याने नागरिक आक्रमक झाले.
या आंदोलनाची माहिती मिळताच एपीएमसी पोलीस ठाण्याचे एएसआय विलास बाबन्नावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलकांना चर्चेसाठी पोलीस ठाण्यात बोलावून घेत मार्ग काढण्याचा सल्ला दिला. ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामपंचायत सदस्य सध्या प्रयागराज येथे असल्याने दोन दिवसांत अधिकृत तोडगा निघेल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. त्यानंतर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला.
गेल्या 10-12 वर्षांपासून हा रस्ता प्रश्न प्रलंबित असून, ग्रामपंचायतीने नोटीस देऊनही अतिक्रमण करणारे ऐकत नाहीत. त्यामुळे आता धडक कारवाई शिवाय पर्याय नाही, असे ग्रामपंचायत सदस्य प्रशांत पाटील यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात स्मिता कालकुंद्रीकर, वंदना होनगेकर, यल्लू पाटील, अर्चना घाटकर, सुरेखा घाटकर, विद्या धाडवे, शांता घाटकर, सुरेखा पानकर, पावना सांडील, रूपा खराडे, श्री नाईक यांसह अनेक नागरिक सहभागी झाले होते.