बेळगाव लाईव्ह : सीमाप्रश्न, कन्नडसक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या बलिदानाच्या स्मृतीसाठी तसेच सीमालढ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाच्या जागे मध्ये बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकाराने ‘हुतात्मा स्मृतिभवन’ उभारण्यात येत असून याचा भूमिपूजन सोहळा गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आज समिती नेते, कारकर्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
प्रसिद्ध सिव्हिल इंजीनियर आणि बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले दाम्पत्याच्या हस्ते कुदळ पूजननाने भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर माजी महापौर मालोजी अष्टेकर, माजी आमदार मनोहर किणेकर, समिती नेते रमाकांत कोंडुसकर, प्रकाश मारगाळे, माजी उपमहापौर प्रकाश शिरोळकर, युवा समिती नेते शुभम शेळके आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
कुदळ पूजन आणि भूमिपूजन पार पडल्यानंतर उपस्थितांना उद्देशून बोलताना तालुका म. ए. समिती अध्यक्ष मनोहर किणेकर म्हणाले, १९८६ च्या कन्नडसक्ती आंदोलनात हिंडलगा, सुळगा, उचगाव, बेळगुंदी, जुने बेळगाव, कंग्राळी आदी गावातील हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ हिंडलगा येथे हुतात्मा स्मृतिभवन उभारण्यात येत आहे. २००५-०६ साली स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषिकांकडून स्मृतिभवन उभारण्याची मागणी करण्यात येत होती. या मागणीला अनुसरून हुतात्म्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, सीमालढ्याचा इतिहास ज्वलंत ठेवण्यासाठी तसेच नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी, इतिहास चित्ररूपाने दाखविण्यासाठी स्मृतिभवनाची उभारणी करण्यात येत आहे.
गेल्या ४० वर्षांपासून होत असलेल्या या मागणीला आता पाठबळ येत असून ‘देर सही दुरुस्त सही’ प्रमाणे सर्वांनी जिद्दीने हुतात्मा भवनाच्या बांधकामाचे काम हाती घेतले आहे. सीमालढ्याचा इतिहास पुसला जाऊ नये यासाठी कर्नाटक सरकारशी आपण जिद्दीने लढत आहोत. कर्नाटक सरकार गेल्या ७० वर्षांपासून सीमावासीयांसमवेत दुटप्पी भूमिकेने वागत असून सीमावासीयांवर होणारे अनन्वित अत्याचार पाहूनही महाराष्ट्र सरकार शांत आहे, हे आपले दुर्दैव आहे. परंतु आता प्रत्येक सीमावासियांच्या एकसंघ होऊन आपली ठाम भूमिका आणि मराठी माणसाची ताकद दाखविण्यासाठी लढा भक्कम करण्याची गरज आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली भरकटलेल्या मराठी भाषिकांना आता एकत्रित आणण्याची गरज आहे. मराठी भाषा आणि संस्कृती पुसू पाहणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी सर्वांनीच एकत्रित येण्याची गरज असल्याचे विचार मनोहर किणेकर यांनी मांडले.
भूमिपूजन पार पडल्यानंतर समिती नेते आर. एम. चौगुले म्हणाले, सीमालढ्याच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी बलिदानाच्या भूमीत त्यागाचे प्रतीक म्हणून स्मृतिभवन उभारण्यात येत आहे. यासाठी चौगुले कुटुंबियांच्यावतीने भरघोस देणगी जाहीर करण्यात येत असून स्मृतिभवनासाठी लागणारे आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत. याचप्रमाणे प्रत्येक सीमावासियांच्या देणगीच्या माध्यमातून स्मृतिभवन उभारण्यात येत आहे. तीन मजली बांधकाम होणाऱ्या स्मृतिभवनाच्या उभारणीसाठी अंदाजे अडीज ते पावणेतीन कोटी रुपयांच्या निधीची गरज असून सीमावासीयांनीही स्मृतिभवनाच्या उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित समिती नेते आणि मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास समिती नेते, कार्यकर्ते, मराठी भाषिक आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.