Thursday, March 13, 2025

/

नामदेव शिंपी समाज बांधवांनी उठविला अस्वच्छता पसरविणाऱ्यांविरोधात आवाज

 belgaum

बेळगाव लाईव्ह : खडेबाजार येथील थळ मंदिरानजीक केरकचरा टाकून अस्वच्छता निर्माण करणाऱ्या दुकानदारांवर नामदेव शिंपी समाज बांधवांनी जोरदार आवाज उठवला. मनपा आरोग्य विभागाने तात्काळ कारवाई करत संबंधित दुकानदारांना दंड ठोठावला. विशेषतः दारू दुकानदाराने फेकलेला कचरा त्याच्याच दुकानाच्या दारात नेऊन ओतल्याने हा विषय चर्चेत राहिला.

खडेबाजार येथील शितल हॉटेल जवळ असलेल्या थळ देवस्थानाच्या मागील बाजूस परिसरातील दुकानदार मोठ्या प्रमाणात कचरा टाकत होते. यामुळे देवस्थानाचे पावित्र्य धोक्यात येत असल्याने मनपा स्वच्छता निरीक्षकांनी वारंवार सूचना दिल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. आज थळ देवस्थानाला 90 वर्षे पूर्ण होत असल्याने विशेष पूजेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर नामदेव शिंपी समाज बांधवांनी अस्वच्छतेविरोधात आवाज उठवला.

देवस्थान परिसरात दारूची रिकामी पाकिटे, प्लास्टिकच्या बाटल्या व इतर कचरा पाहून संतप्त झालेल्या समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेतला. याची माहिती मिळताच मनपा अधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मनपा अधिकाऱ्यांनी तात्काळ सफाई करून संबंधित दारू दुकानदाराने फेकलेला कचरा पुन्हा त्याच्या दुकानासमोर नेऊन ओतला. यावेळी परिसरात बघ्यांची गर्दी झाली.Garbage

मनपा अधिकाऱ्यांनी केवळ दारू दुकानदारालाच नव्हे, तर देवस्थान परिसरात कचरा टाकणाऱ्या अन्य दुकानदारांकडूनही एकूण 15-20 हजार रुपयांचा दंड वसूल केल्याचे वृत्त आहे. यापुढे अस्वच्छता झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नामदेव शिंपी समाज बांधवांनी दिला.

या वेळी नगरसेवक जयतीर्थ सौंदत्ती, हेमंत हावळ, अजित कोकणे, विनोद भागवत, सुरेश पिसे, महेश खटावकर, अमर कोपर्डे, देवस्थानाचे पुजारी प्रवीण कणेरी यांच्यासह नामदेव शिंपी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.