बेळगाव लाईव्ह :बेनकनहळ्ळी ते गणेशपूर पाईपलाईन या सुमारे 1.5 कि.मी.च्या रस्त्यांवर सहा ठिकाणी कचरा टाकला जात असल्यामुळे या रस्त्याला बकाल स्वरूप प्राप्त झाल्यामुळे रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच ग्रामपंचायतीसह आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची जोरदार मागणी केली जात आहे.
बेनकनहळ्ळी ते गणेशपूर पाईपलाईन या मुख्य रस्त्यावर ये-जा करणाऱ्या दररोज मोठ्या प्रमाणात रस्त्याकडेला पडलेल्या कचऱ्यासह त्याच्या दुर्गंधीला तोंड द्यावे लागत आहे. पादचाऱ्यांना तर या रस्त्यावरून जाताना नाक मुठीत धरून जावे लागत आहे.
बेनकनहळ्ळी ते गणेशपुर रस्त्यावरील कचऱ्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून तीव्र बनली आहे. तथापि हिंडलगा ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी व वाहन चालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ‘येथे कचरा टाकू नका’ अशा आशयाचे फलक लावूनही त्याच ठिकाणी सुका व ओला कचरा प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून टाकला जात असल्याने रस्त्यावर कायम अस्वच्छता पसरलेली असते.
त्यामुळे त्या ठिकाणी भटक्या जनावरांचा सततचा वावर असतो. या पद्धतीने मुख्य रस्त्याशेजारी उघड्यावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्यामुळे जागरूक नागरिकात संताप व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीने कोणतीही उपाययोजना केली नसल्याने कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.
मोठ्या प्रमाणात टाकलेला कचरा आणि त्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी ग्रामपंचायतीसह आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेनकनहळ्ळी ते गणेशपुर पाईपलाईन रस्त्यावरील कचऱ्याची समस्या तात्काळ मिटवावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून केली जात आहे.
नुकताच बेळगाव महानगरपालिकेला घनकचऱ्यसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या बातम्या आपण वाचल्या आहेत मात्र प्रत्यक्षात बेळगाव शहर परिसरात आजूबाजूच्या खेडेगावात कचरा मुक्त होणे गरजेचे आहे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत आणि जो निधी मंजूर झाला त्याचा योग्य विनियोग देखील होण्याची गरज व्यक्त होत आहे.