बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील गणाचारी गल्ली येथील बकरी मंडईची जागा वादग्रस्त ठरण्याची चिन्हे दिसू लागली असून गेल्या कित्येक वर्षापासून बकऱ्यांच्या बाजारासाठी राखीव असलेल्या या जागेत समुदाय भवनाची उभारणी करावी, या मागणीसाठी प्रभाग क्र. 7 मधील गणाचारी गल्ली रहिवासी संघटनेतर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.
शहरातील गणाचारी गल्ली येथील बकरी मंडईच्या जागेत समुदाय भवन उभारण्यात यावे या मागणीसाठी स्थानिक रहिवाशांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्या ठिकाणचे अतिक्रमण हटवा, आम्हाला बदल हवा, महापालिकेची जागा वाचवा, समुदाय भवन झालेच पाहिजे, प्रभाग क्र. 7 कडून जाहीर पाठिंबा अशा मागणीचे फलक आता धरून जोरदार निदर्शने करत निघालेला गणाचारी गल्ली येथील रहिवाशांचा आजचा मोर्चा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता.
जिल्हाधिकारी कार्यालय आवारात मोर्चाची सांगता होऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकाने निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना गणाचारी गल्ली येथील रहिवासी असलेल्या महिलांनी बकरी मंडईमध्ये समुदाय भवन झालेच पाहिजे असे मत व्यक्त केले. बकरी मंडईची जागा ही घनाचारी गल्लीला दान स्वरूपात मिळालेली जागा आहे त्यामुळे या जागेचा जनतेसाठी सदुपयोग व्हावयास हवा त्या अनुषंगाने या ठिकाणी समुदाय उभारण्याचा निर्णय स्थानिक नगरसेवकांनी घेतला आहे हा निर्णय स्तुत्य असून आमचा त्याला पाठिंबा आहे कारण आमच्या भागात जवळपास कोणतेही मंगल कार्यालय वगैरे नसल्यामुळे गैरसोय होत असते 25-30 हजार रुपये देऊन एखादे कार्यालय भाड्याने घेण्याऐवजी गणाचारी गल्ली येथेच समुदाय भवन झाल्यास आम्हा सर्वांची चांगली सोय होणार आहे, असे संबंधित महिलांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील गणाचारी गल्ली येथील बकरी मंडईची जागा गेल्या कित्येक वर्षापासून बकऱ्यांच्या बाजारासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. महापालिकेत कागदोपत्री तशी नोंद असलेल्या या बकरी मंडईची देखभाल बेळगावच्या खाटीक समाजाकडून केली जाते. पूर्वीपासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून गणाचारी गल्ली येथील संबंधित जागेत बकऱ्यांचा बाजार भरतो.
आता विकासाच्या नावाखाली सदर जागेत समुदाय भवन वगैरे कामे राबविण्यास सुरुवात केल्यास पूर्वापार चालत आलेली सदर बकरी मंडई इतिहास जमा तर होणार नाही ना? अशी चिंता बेळगावचा खाटीक समाज तसेच बकऱ्यांच्या बाजारात सहभागी होणाऱ्या ग्राहक आणि विक्रेत्यांना लागून राहिली आहे.