बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेच्या आयुक्त शुभा बी. यांनी सकाळी किल्ला तलाव परिसराचा पाहणी दौरा केला. परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसून आल्याने त्यांनी महापालिकेच्या आरोग्य विभाग आणि अभियंता अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
बेळगाव शहरातील ऐतिहासिक किल्ला तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याचे समोर आले आहे.
यावर त्वरित लक्ष घालण्यासाठी महापालिका आयुक्त शुभा बी यांनी स्वतः सकाळीच पाहणी दौरा करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. सुरक्षा रक्षक असतानाही कचरा टाकला जातो, हे कसे? असा सवाल करत त्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
तलाव परिसरात घरगुती कचरा टाकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देत, संबंधितांवर नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. तसेच, नागरिकांनीही तलाव परिसर स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
परिसराची स्वच्छता राखणे ही महापालिकेबरोबरच नागरिकांचीही जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जर पुन्हा अशा प्रकारे कचरा आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.