बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी, बेळगाव येथील पहिल्या रेल्वे गेट येथे शुक्रवार पेठपासून एम. जी. रोडपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिजची उभारणी करण्यास स्थानिकांनी जोरदार विरोध केला असून तशा आशयाचे पत्र त्यांनी बांधकाम /सर्वेक्षण विभाग हुबळीचे मुख्य अभियंता टी. व्यंकटेश्वर राव यांना धाडले आहे.
शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील किशोर ए. गुमास्ते यांच्या नेतृत्वाखाली हे पत्र धाडण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षापासून पहिल्या रेल्वे गेट येथील रस्त्यावरून दररोज फक्त दुचाकी, तिचाकी आणि चार चाकी वाहनांचीच रहदारी असते.
त्यामुळे आम्हा शुक्रवार पेठ व सी. डी. देशमुख रोड टिळकवाडी येथील रहिवाशांचा रेल्वे गेटच्या ठिकाणी टिळकवाडीतील शुक्रवार पेठपासून एमजी रोडपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज बांधण्यास सक्तविरोध आहे तेव्हा आमची विनंती आहे की फ्लाय ओव्हर ब्रिज ऐवजी या ठिकाणी अंडरग्राउंड ब्रिज बांधला तरी पुरेसा होणार आहे.
जर आपले खाते या ठिकाणी फ्लावर ब्रिज बांधण्याची योजना आखत असेल तर ती योजना कृपया रद्द करून पहिल्या रेल्वे गेट येथे अंडरग्राउंड ब्रिज बांधावा. त्यामुळे सर्वांचेच हित साधणार असून ते आर्थिक दृष्ट्या देखील हिताचे ठरणार आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे यापूर्वीच बांधलेला एक ब्रिज त्याचा दाखला म्हणून देत आहोत. कोल्हापूर रेल्वे स्थानकाजवळ राजारामपुरी ते बस स्थानकापर्यंत अंडरग्राउंड ब्रिज बांधण्यात आला असून जो सध्या सर्वदृष्ट्या उपयुक्त ठरत आहे. तेंव्हा आमची विनंती आहे की पहिल्या रेल्वे गेट येथे अंडरग्राउंड ब्रिजच बांधावा. ज्यामुळे प्रचंड मोठा खर्च देखील टळणार आहे, अशा आशयाचा तपशील टिळकवाडी येथील रहिवाशांच्या पत्रात नमूद आहे.
पत्राच्या शेवटी किशोर गुमास्ते यांच्यासह धर्मेंद्र एच. पुरोहित, सुरज मोहिरे, राहुल मोहिरे, रितिक राजपुरोहित, प्रशांत सोलापूर, प्रशांत रेवणकर, सुनील माणगावकर, राजू भोगले, संजय घोलप, उदय बाळेकुंद्री, किरण शेट्टी, डी. बी. रायकर, अभय मुतालिक -देसाई, स्नेहा कुलकर्णी, विजय पाटील, सदानंद रेवणकर आदी बऱ्याच जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत. उपरोक्त पत्राच्या प्रती बेळगाव जिल्हाधिकारी, बुडा आयुक्त, महापालिका आयुक्त, बेळगावचे खासदार आणि बेळगाव स्मार्ट सिटी कार्यालय यांनाही धाडण्यात आल्या आहेत.