बेळगाव लाईव्ह :सध्याच्या उन्हाळ्यात शेतकरी आणि त्यांच्या जनावरांच्या हितासाठी घटप्रभा नदीच्या हुक्केरी कोटबागी येथील डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरित सेनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्य रयत संघ आणि हरित सेनेचे राज्याध्यक्ष चुनप्पा पुजेरी यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. घटप्रभा नदीच्या डाव्या कालव्यातून हुक्केरी कोटबागी भागात पाणी सोडणे गरजेचे आहे. उन्हाळ्याला प्रारंभ झाल्यामुळे सध्या या ठिकाणचे कालवे, विहिरी, बोअरवेल वगैरे पाण्याची स्त्रोत कोरडी पडली आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना आणि जनावरांना पाणी मिळणे कठीण झाले आहे. पाण्याअभावी गुराढोरांचे हाल होत आहेत. तरी सदर कालव्यातील बंद असलेला पाणी पुरवठा युद्धपातळीवर पूर्ववत सुरळीत करावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी निवेदनाचा स्वीकार करून कालव्यातून पाणी सोडण्याची जी आपली मागणी आहे त्या संदर्भातील अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार प्रादेशिक आयुक्तांना आहे त्यामुळे तुमचे हे निवेदन मी त्यांच्याकडे पाठवून देऊन कालव्यात पाणी सोडण्याची शिफारस करेन असे आश्वासन दिले.
जिल्ह्यातील पाणी साठ्यासंदर्भात बोलताना कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात महाराष्ट्रातून 2 टीएमसी पाणी सोडण्याबाबत प्रस्ताव तयार केला जात आहे. लवकरच हा प्रस्ताव पाटबंधारे खात्याकडून महाराष्ट्र सरकारला पाठवला जाईल. मला खात्री आहे की आमचा हा प्रस्ताव मान्य होऊन महाराष्ट्रातून 2 टीएमसी पाणी कृष्णा नदीत सोडले जाईल.
मागील वर्षी देखील महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकार यांच्या समन्वयातून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेसाठी कृष्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रात महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात आले होते. यावेळी देखील तसेच घडेल असे जिल्हाधिकारी रोषण यांनी सांगितले.
निवेदन सादर करतेवेळी चुनप्पा पुजेरी यांच्या समवेत सुरेश परगन्नवर, जावेद मुल्ला वगैरे रयत संघटनेचे पदाधिकारी आणि बरेच शेतकरी उपस्थित होते