बेळगाव लाईव्ह :भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या मालिकेमुळे आझमनगर आणि नेहरूनगरमधील रहिवासी भीतीने ग्रासले असून 24 तासांपेक्षा कमी कालावधीत येथे कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या तीन घटना घडल्या आहेत.
भटक्या कुत्र्यांच्या कळपामुळे अझमनगर व नेहरूनगर येथे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात दररोज मार्गक्रमण करणे आव्हानात्मक बनले आहे. कुत्र्यांचे आक्रमक कळप रस्त्यावर फिरत असल्यामुळे येथील सार्वजनिक सुरक्षा धोक्यात आली आहे.
अशाच एका हल्ल्यात रात्री 10:45 च्या सुमारास प्रार्थना करून परतणाऱ्या 75 वर्षीय वृद्धावर हल्ला करून खाली पाडणाऱ्या कुत्र्यांच्या कळपाने त्याला चावायला सुरुवात केली. वन्यजीव माहितीपटाला साजेशे हे कुत्र्यांच्या हल्ल्याचे दृष्य थरकाप उडवणारे होते.
सुदैवाने एका वाटसरूने हस्तक्षेप करून त्या वृद्धाला कुत्र्यांच्या कचाट्यातून सोडून पुढील गंभीर दुखापतीपासून वाचवले. त्यानंतर त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिसरा क्रॉस आणि पाचवा क्रॉस रस्त्यावरही अशाच प्रकारच्या हल्ल्यांची नोंद झाली.
एकंदर भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या दहशतीमुळे अझमनगर व नेहरूनगर येथील रहिवासी संकटात सापडले आहेत. मोकाट कुत्री भेदरून पळणाऱ्या पादचाऱ्यांचा पाठलाग करत असल्याच्या घटना येथे वारंवार घडत आहेत. परिणामी भीतीपोटी अनेकांना विशेषतः महिला, मुले आणि वृद्धांना त्यांचे मार्ग बदलावे लागत आहेत. कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट हे कारण देखील मोकाट कुत्र्यांची समस्या आणखी बिकट होण्यास कारणीभूत ठरत आहे. अन्नाच्या शोधार्थ असलेली भटकी कुत्री लोकांनी सार्वजनिक ठिकाणी फेकलेल्या कचरा भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या फाडतात आणि रस्त्यावर कचरा पसरवतात.
अस्वच्छ वातावरण आणि कुजलेल्या मांजरींचे मृतदेह यामुळे हा परिसर राहण्याअयोग्य बनला आहे. रहिवाशांनी वारंवार चिंता व्यक्त करत तक्रारी करून देखील अधिकाऱ्यांनी या समस्येचे निवारण करण्यासाठी फारसे काही केलेले नाही. या ठिकाणी दर 50 ते 100 मीटरवर भटक्या कुत्र्यांचे कळप आढळून येत असल्यामुळे स्थानिकांमध्ये भीती स्पष्टपणे जाणवते. मदतीसाठी कोणाकडे जावे याबद्दल बऱ्याच जणांमध्ये अनिश्चितता आहे. कारण या विषयावर परिसरातील चर्चेत वर्चस्व आहे.
अधिक गंभीर घटना घडण्यापूर्वी भटक्या कुत्र्यांच्या संकटाला आळा घालण्यासाठी तातडीने आणि प्रभावी कारवाई करण्याची विनंती रहिवासी महानगरपालिकेला करत आहेत. जर त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, ज्यामुळे जीव धोक्यात येऊ शकतात आणि परिसरातील जीवनमान बिघडू शकते.