बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील इंद्रप्रस्थनगर येथील निवासी संकुलात ड्युटीवर असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांवर एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना काल मंगळवारी घडली. कुत्र्याने आवारात घुसून दोन्ही सुरक्षा रक्षकांचा चावा घेतल्यामुळे त्यांना गंभीर इजा झाली आहे.
कुत्र्याच्या चाव्यामुळे गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव होत असलेल्या त्या सुरक्षारक्षकांना तातडीने बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करून वैद्यकीय उपचार देण्यात आले.या घटनेची माहिती मिळताच नगरसेवक नितीन जाधव यांनी महानगरपालिकेशी संपर्क साधला आणि त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले. अलीकडे रस्त्यावर अन्न सहज उपलब्ध होत असल्याने शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. कुत्र्यांचे कळप ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुलांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे यासंदर्भात महानगरपालिका अधिकाऱ्यांनी जालीम कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सुरक्षारक्षकांवरील कुत्र्याच्या हल्ल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे निरीक्षक राजू संकन्नावर यांना देण्यात येताच त्यांनी या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेच्या पथकाने भटक्या कुत्र्यांच्या निर्जंतुकीकरणाची जबाबदारी असलेल्या कंत्राटदारासह सुमारे एक तास शोध मोहीम राबवली आणि अखेर इंद्रप्रस्थ नगरमध्ये त्या भटक्या कुत्र्याला यशस्वीरित्या पकडले. सध्या श्रीनगरमधील श्वान निर्जंतुकीकरण केंद्रात या कुत्र्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
दरम्यान भटक्या कुत्र्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त होत आहे. कारण गणेशपूरमध्ये 5 वर्षांच्या मुलीवर झालेल्या हल्ल्यानंतर, एका आठवड्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. याव्यतिरिक्त गेल्या 24 तासांत आझमनगर आणि नेहरूनगरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
एका धक्कादायक घटनेत रात्री 11:50 च्या सुमारास घरी जाणाऱ्या 75 वर्षीय वृद्धावर भटक्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला करून त्याला रस्त्यावर लोळवले. सुदैवाने आसपासच्या नागरिकांनी हस्तक्षेप करून त्याला वाचवले. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचे प्रमाण वाढत असल्यामुळे महानगरपालिकेने या वाढत्या समस्येवर तात्काळ आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.