बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील जुनी जिल्हा पंचायत ते चव्हाट गल्ली पर्यंतच्या खाचखळगे पडून दुरावस्था झालेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय (डीसी कंपाउंड) आवारातील जुनी जिल्हा पंचायत ते चव्हाट गल्लीपर्यंतचा रस्ता गेल्या कित्येक महिन्यांपासून खराब झालेला आहे. आवारातील इतर रस्ते सुव्यवस्थेतीत ठेवण्यात आले असताना या रस्त्याच्या विकासाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
खाचखळगे पडून सदर रस्त्याची पार दैना उडाली असल्यामुळे वाहन चालकांना विशेष करून दुचाकी वाहन चालकांना मोठी कसरत करत आपली वाहने चालवावी लागतात. या रस्त्याच्या दुरुस्तीबद्दल यापूर्वी बऱ्याचदा मागणी करून देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आमदार, खासदार नगरसेवक, तालुका व जिल्हा पंचायत सदस्य यांची या रस्त्यावरून कायम वर्दळ असून देखील तो विकासापासून दुर्लक्षित असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
त्याचप्रमाणे बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यावर लक्ष ठेवून असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांचे देखील आपल्याच कार्यालय आवारातील दुर्दशा झालेल्या या रस्त्याकडे अद्याप लक्ष गेले नसल्याबद्दल सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे.
त्यामुळे जिल्ह्याचे मुख्य प्रशासकीय केंद्र असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्याकडे दुर्लक्ष करणारे प्रशासन शहर व जिल्ह्यातील इतर रस्त्याकडे काय लक्ष देणार? असा संतप्त सवाल केला जात आहे. तसेच जुनी जिल्हा पंचायत ते चव्हाट गल्लीपर्यंतच्या रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली जात आहे.