बेळगाव लाईव्ह :सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात शेत पिकांसाठी पाण्याची गरज लक्षात घेऊन 12 तास थ्री -फेज वीजपुरवठा करावा, अक्रम सक्रम योजना सुरू करावी, एपीएमसी व जय किसान ही दोन्ही भाजी मार्केट शेतकऱ्यांसाठी उपलब्ध ठेवा, अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नेगील योगी रयत संघाने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले. तत्पूर्वी प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील तापलेल्या रस्त्यावर बसून शेतकऱ्यांनी धरणे सत्याग्रह करत साऱ्यांचे लक्ष वेधले होते.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी नेगील योगी रयत संघातर्फे आज सोमवारी सकाळी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये बेळगाव शहर तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी बहुसंख्येने सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील रस्त्यावर येताच पोलिसांनी बॅरिकेड घालून मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये थोडी शाब्दिक खडाजंगी उडाली.
आधीच रखरखते ऊन त्यात पोलिसांनी आडकाठी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जोरदार निदर्शने करत तापलेल्या रस्त्यावरच ठिय्या मारून धरणे आंदोलनाला सुरुवात केली. याबाबतची माहिती मिळताच जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. भीमाशंकर गुळेद यांच्या समवेत जातीने आंदोलन स्थळी येऊन शेतकऱ्यांची भेट घेतली.
यावेळी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना मान देत जिल्हाधिकारी रोशन यांनी देखील खाली बसून त्यांचे म्हणणे व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी नेगील योगी रयत संघाचे राज्याध्यक्ष रवी पाटील व जिल्हाध्यक्ष शंकर बोळन्नावर यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडून त्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदनाचा स्वीकार करून आपल्यापरीने आवश्यक ती कार्यवाही करण्याबरोबरच आपण शेतकऱ्यांच्या मागण्या सरकार समोर मांडू असे आश्वासन दिले.
धरणे आंदोलनाप्रसंगी बेळगाव लाईव्हशी बोलताना खानापूरचे शेतकरी नेते मनोहर सुळेभावीकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्या मांडण्यासाठी आम्ही येथे आलो असताना त्याची दखल घेण्याऐवजी प्रशासनाने आम्हाला येथे भरउन्हात ताटकळत ठेवले आहे. यासाठी आम्ही सरकारचा धिक्कार करत आहोत असे सांगितले. शेतकऱ्यांच्या पिकासाठी 12 तास थ्री फेज वीजपुरवठा केला जावा. खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जंगली प्राण्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागते. या त्रासाचे निवारण केले जावे. शेतकऱ्यांना निरंतर वीज पुरवठा व्हावा यासाठी अक्रम सक्रम योजना पुनश्च सुरू केली जावी, अशा आम्हा शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आहेत.
या मागण्यांची त्वरित पूर्तता झाली पाहिजे. सदर मागण्या आम्ही आमदार व इतर लोकप्रतिनिधी समोर मांडल्या आहेत. मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नसल्यामुळे आज आमच्यावर या ठिकाणी मोर्चा काढून धरणे सत्याग्रह करण्याची वेळ आली आहे, असे शेतकरी नेते सुळेभावीकर यांनी शेवटी सांगितले.