बेळगाव लाईव्ह : केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजारापू राममोहन नायडू यांची भेट घेऊन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांसाठी विमानसेवा सुधारण्याची मागणी केली आहे. वाढत्या रहदारीच्या पार्श्वभूमीवर या भागात उड्डाण सुविधांमध्ये वाढ करावी, अशी मागणी केली.
नवी दिल्ली येथे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजारापू राममोहन नायडू यांच्यासह केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांसाठी विमानसेवा सुधारण्याची मागणी केली.
उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्हे गेल्या काही दशकांपासून विकासाच्या प्रतीक्षेत आहेत. बंगळुरूमधील देवन्हळ्ळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील वाढत्या लोकसंख्येमुळे दुसऱ्या विमानतळाच्या उभारणीसाठी तयारी सुरू आहे. मात्र, बंगळुरूमध्ये लोकसंख्या वाढल्याने व वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनल्याने हुबळी-धारवाड, बेळगाव आणि इतर जिल्ह्यांमधील विमानतळांचा दर्जा सुधारण्याची गरज निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांमध्ये नवीन सुविधा उभारण्यासाठी आणि विद्यमान विमानतळांचे आधुनिकीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी जारकीहोळी यांनी केली.
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग आवश्यक सहकार्य करेल, असे केंद्रीय मंत्र्यांनी आश्वासन दिले आहे.