बेळगाव लाईव्ह :उन्हाळ्याला सुरुवात झाली असल्यामुळे जिल्ह्यामध्ये जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावू नये याची दक्षता घेण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले
शहरात आज शुक्रवारी सकाळी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. जिल्हाधिकारी (डीसी) रोशन यांनी सांगितले की, उन्हाळ्याला सुरुवात होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक पूर्वतयारी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने काल मी आणि माझे सहकारी अप्पर जिल्हाधिकारी आम्ही दोघांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांसोबत बैठक घेतली. आपल्या जिल्ह्यातील कोणकोणत्या गावात अथवा भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. ती गावे आत्ताच ओळखून आम्ही आवश्यक निर्देश दिले आहेत ज्या ठिकाणी यापूर्वीच पिण्याच्या पाण्याची समस्या उद्भवली आहे त्या ठिकाणी वेळ न घालवता स्थानिक अनुदानाचा वापर करून खाजगी बोअरवेल भाड्याने घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा, तसेच टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्याचा आदेश मी जारी केला आहे. जर टँकरने जनतेला पाण्याचा पुरवठा केला जात असेल तर त्या टँकरला जीपीएस बसवला गेला पाहिजे. ज्याद्वारे टँकर किती किलोमीटर धावला त्याची अचूक नोंद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश मी दिले आहेत. त्याचप्रमाणे लोकांना टँकरद्वारे पुरवले जाणारे पाणी नेमके कोठून आणले जाते? याची माहिती घेण्याची सूचनाही केली आहे. उदाहरणार्थ टँकरमधून बोअरवेलच्या पाण्याचा पुरवठा करण्यापूर्वी त्या बोअरवेलचे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही? हे तपासण्यात आले पाहिजे. त्यासाठी प्रथम रॅपिड टेस्ट किटच्या माध्यमातून त्या बोअरवेलच्या पाण्याची गुणवत्ता चांचणी केली गेली पाहिजे. चांचणी अहवाल सकारात्मक असेल तरच त्या पाण्याचा टँकरद्वारे पुरवठा करण्यास परवानगी दिली जावी अशी सक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, खाजगी बोअरवेल भाड्याने घेण्याचा जो उपक्रम आहे, त्या अंतर्गत भाडे निश्चितीचा निर्णय तालुका पातळीवर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीने घ्यावयाचा आहे. त्यानंतर बोअरवेलच्या पाण्याची गुणवत्ता चाचणी व्हावयास हवी आणि मग त्यानंतरच तिथून पाण्याचा पुरवठा केला जावा असे निर्देश मी दिले आहेत. पाणीपुरवठा संदर्भातील सर्व बिले अदा करण्यासाठी आमच्याकडे एक ऑनलाईन सॉफ्टवेअर आहे. त्याच्या माध्यमातून जीपीएस ट्रॅकिंग वगैरे सर्व गोष्टी पडताळून बिले अदा केली जातील. सध्या तरी पाण्यासंदर्भात विशेष कोणतेही अनुदान उपलब्ध करण्यात आलेले नाही, कोणतीही मोठी समस्या निर्माण झालेले नाही.
बेळगाव शहराच्या उत्तर आणि दक्षिण भागात सध्या आम्ही हिडकल आणि राकसकोप जलाशयातून पाणी पुरवठा केला जात आहे. सर्व आमदारांची मी बोललो आहे जुन्या पाईपलाईनची जी दुरुस्ती आहे ती करेने करण्यात यावी अशी सूचना मी संबंधित खात्यांना केली होती त्यांनी ती केली आहे शहरातील एल अँड टी कंपनीचे 24 तास पाणी पुरवठा योजनेचे जे काम सुरू आहे ते लवकरात लवकर पूर्ण केले जावे. अधिकारावर आल्यानंतर जल शुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढवण्याचे काम लवकर पूर्ण करण्याची सूचना मी केली होती. ते काम देखील जवळपास पूर्ण होत आले असून माझ्यामते या महिन्याभरात ते पूर्ण होईल. जनतेला पुरवठा केल्या जाणाऱ्या पाण्याचा दर्जा देखील उत्तम असावा असे मला सांगावेसे वाटते. आम्ही आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून जर टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्यवस्थित केला तर टँकर माफीयांचा प्रश्नच उद्भवणार नाही. त्यासाठी मी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना केली आहे की मागणीनुसार संबंधित ठिकाणी तात्काळ पाण्याची पूर्तता केली जावी.
टँकरद्वारे पाणी पुरवठा करणाऱ्या खाजगी पुरवठाधारकांनी सरकारने जे दर निश्चित केले आहेत त्यानुसारच टँकरचे पैसे आकारले पाहिजेत. त्यापेक्षा जास्त दर आकारणाऱ्यांवर कारवाई करावी असे निर्देश मी महापालिका व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आयुक्त आणि मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती शेवटी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
पाण्याची टंचाई… दोन टीएमसी पाण्याची महाराष्ट्राकडे मागणी,जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची माहिती
बेळगाव – उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पाणी टंचाई समस्या दिवसेंदिवस तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कृष्णेतून दोन टीएमसी पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्र सरकारच्या पाणीपुरवठा विभागाला पत्र पाठवून मागणी करण्यात आली आहे. तत्पूर्वी प्रादेशिक आयुक्तांना ही पत्र पाठवून माहिती दिली आहे अशीही माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
हिडकल धरणातून पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक आयुक्तांना देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार पाणीपुरवठा केला जाईल असेही जिल्हाधिकारी रोशन यांनी सांगितले आहे.