बेळगाव लाईव्ह :हिंदवाडी येथील दुतर्फा रस्त्यावर गोमटेश हायस्कूल व कॉलेज जवळील स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघातांना आळा घालण्यासाठी सदर धोकादायक स्पीड ब्रेकर्स पांढरे पट्टे मारून तात्काळ रंगवावेत, अशी मागणी केली जात आहे.
हिंदवाडीतील दुतर्फा रस्त्यावर गोमटेश कॉलेजनजीक स्पीड ब्रेकर बसवण्यात आले आहेत. दोन्ही बाजूच्या रस्त्यावरील या स्पीड ब्रेकर पैकी एका वरील पांढरे पट्टे पुसट झाले आहेत तर दुसऱ्या वरील पूर्णपणे नाहीसे झाले आहेत. परिणामी हे स्पीड ब्रेकर्स या रस्त्यावरून ये -जा करणाऱ्या वाहनचालकांच्या पटकन निदर्शनास येत नाहीत.
विशेष करून भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी स्वारांसाठी हा प्रकार धोकादायक ठरत आहे. यामुळे सदर स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी पथदिपाचा प्रकाश दुभाजकावरील झाडाच्या फांद्यांमुळे अडला जाऊन रस्त्यावरील स्पीड ब्रेकर अंधारात बुडालेला असतो. यामुळे बहुतांश अपघात रात्रीच्या वेळी घडत असतात. तरी एखादा गंभीर अपघात होऊन जीवित हानी होण्याची वाट न पाहता सदर स्पीड ब्रेकरची युद्धपातळीवर रंगरंगोटी करून त्यावर पांढरे पट्टे ओढावेत, अशी मागणी परिसरातील व्यावसायिक व नागरिकांकडून केली जात आहे.
गोमटेश कॉलेज शेजारील नंदिनी आउटलेटच्या मालक व डेअरी चालकाने बेळगाव लाईव्हशी बोलताना आमच्या दुकानासमोरील समोरील दुतर्फा रस्त्यावर दोन्ही बाजूला स्पीड ब्रेकर बसवण्यात आले आहेत. मात्र गेल्या कांही वर्षापासून त्याची रंगरंगोटी नसल्यामुळे या स्पीड ब्रेकरवरील वाहनचालकांना सतर्क करणारे पांढरे पट्टे नाहीसे झाले आहेत. परिणामी रात्रीच्या वेळी तर सोडाच दिवसादेखील ते पटकन वाहनचालकांच्या निदर्शनास येत नाहीत.
त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. विशेष करून रात्रीच्या वेळी स्ट्रीट लाईटचा प्रकाश दुभाजकावरील झाडांच्या फांद्यामुळे रस्त्यापर्यंत पोहोचत नाही. परिणामी झाडाच्या सावलीच्या अंधारातील स्पीड ब्रेकर न दिसल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तरी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील रस्त्यावरील धोकादायक स्पीड ब्रेकर्सवर पांढरे पट्टे मारून ते दृश्यमान करावेत, अशी मागणी नंदिनी आउटलेटचे मालक व डेअरी चालकाने केली.