बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील उचगाव येथे १०५ वर्षांची परंपरा असलेल्या श्री मळेकरणी देवीच्या वार्षिक सप्ताहावरून वाद निर्माण झाला होता मात्र न्यायालयाच्या माध्यमातून वार्षिक सप्ताह साजरा करण्याची परवानगी दिली आहे.
गेली १०५ वर्षे उचगाव येथे होळी पौर्णिमेनिमित्त पाच दिवसांचा श्री मळेकरणी देवी सप्ताह साजरा केला जातो. मात्र यंदा हा उत्सव थांबवण्याचा निर्णय देसाई बंधू कमिटीने घेतला होता. त्यांनी देवीच्या जागेवर आपला हक्क सांगत ग्रामपंचायत अध्यक्ष मथुरा तेरसे आणि ग्रामस्थांवर बेळगाव न्यायालयात याचिका दाखल केली होती.निर्माण झालेला वाद अखेर परस्पर सामंजस्याने मिटविण्यात आला आहे. यासंदर्भात देसाई बंधू आणि ग्रामस्थ पक्षांनी संयुक्त निवेदन सादर केले असून, सर्व ग्रामस्थांच्या सहमतीने १०५ वर्षांची परंपरा कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
उचगाव गावातील पालखी उत्सवाबाबत वाद निर्माण झाला होता. मात्र, वादी आणि प्रतिवादी यांनी परस्पर सहमतीने हा वाद मिटवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात दोन्ही पक्षांनी संयुक्त निवेदन सादर केले असून, त्यानुसार वादींना पालखी उत्सवातील पूजेप्रमाणेच इतर धार्मिक विधींमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे.
ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे आणि पुंडलिक कदम यांच्या विरोधात तक्रार दाखल करत, उत्सव रोखण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. बेळगावच्या 7व्या अतिरिक्त सिव्हिल न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने निकाल दिला आणि सप्ताह उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली.
यासंदर्भात ग्रामपंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, सालाबादप्रमाणे जसा आजवर सप्ताह उत्सव साजरा केला गेला, त्याप्रमाणे यंदाही उत्सव साजरा करावा, याला कुणीही विरोध करता कामा नये, असा न्यायालयाचा निकाल लागला आहे. न्यायालयाने गावकऱ्यांच्या बाजूने निकाल देत सप्ताहासाठी परवानगी दिली आहे. हा उत्सव केवळ धार्मिक विधी नसून, संपूर्ण गावाची एकात्मता आणि संस्कृती जपणारा सोहळा आहे. ग्रामस्थांसाठी हा श्रद्धेचा विषय असून, याच मुद्द्यावर आम्ही न्यायालयात बाजू मांडली. आता सप्ताह कोणत्याही अडथळ्याविना पार पडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
माणिक होनगेकर यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना सांगितले की, आजपर्यंत गावात अशी परिस्थिती कधीही उद्भवली नाही. मात्र अलीकडे श्री मळेकरणी देवीच्या पशुबळी प्रथेवर निर्बंध लावण्यात आले, त्यानंतर गावातील वातावरणात काहीसा बदल झाला. दरवर्षी उचगाव मध्ये भव्य सप्ताह सोहळा आयोजिला जातो. मात्र यंदा या उत्सवावर आक्षेप घेण्यात आला. न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडली आणि निकाल आमच्या बाजूने लागला, असे ते म्हणाले. यासंदर्भात श्रीकांत कांबळे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले.
उचगाव पालखी उत्सव वादाचा सामंजस्याने निकाल जाहीर करण्यात आला असून दि. १३ मार्च २०२५ ते १७ मार्च २०२५ या कालावधीत होणाऱ्या पालखी उत्सवात वादी आणि सर्व ग्रामस्थ एकत्र सहभागी होतील. तसेच, गेल्या १०५ वर्षांची ही परंपरा एकीच्या भावनेने पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात देसाई बंधू कमिटीचे सदस्य डॉ. प्रवीण देसाई यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना उत्सव सोहळ्यासंदर्भात न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सामंजस्याने तोडगा काढण्यात आला आहे. सालाबाद प्रमाणे आयोजिण्यात येणारा उत्सव देसाई बंधू तसेच ग्रामस्थांनी दोघांनी मिळून करावयाचा आहे. शिवाय या सोहळ्याचे आयोजन आणि एकंदर सर्व व्यवस्थापन देखील दोघांनी मिळूनच करायचे आहे, न्यायालयात झालेल्या सुनावणीत देखील सामंजस्याने तोडगा काढण्यात आला असल्याचे ते म्हणाले.