बेळगाव लाईव्ह : सीमाभागातील मराठी भाषिकांचे लोकशाहीने दिलेले हक्क आणि अधिकार पायदळी तुडवत कर्नाटक सरकारने हिटलरशाहीचा अवलंब करत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांना पोलिसांनी ‘रावडी शिटर’ ठरविले असून बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली आहे.
समिती युवा नेते शुभम शेळके यांना सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकल्याच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. माळमारुती पोलिसांनी काल शुभम शेळके यांना अटक करून गुन्हा नोंदवला आहे. यापूर्वीही त्यांच्या नावावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये सुमारे 12 गुन्हे दाखल झाले आहेत.
शुभम शेळके रावडी शिटर असल्याचे सांगत मराठी तरुणाने मराठीसाठी केलेल्या आग्रहामुळे त्याचा केलेला सत्कार कारणीभूत ठरवत सोशल मीडियावर प्रक्षोभक पोस्ट टाकण्याच्या आरोपाखाली शुभम शेळके यांच्यावर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याच पोस्टविरुद्ध गुन्हा दाखल करून शेळके यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर नागरिकांनी कोणतीही पोस्ट टाकण्यापूर्वी थोडा विचार करावा. आपल्या पोस्टमुळे इतर लोकांवर परिणाम होऊन गंभीर समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जावी, असा संदेश पोलीस आयुक्तांनी दिला.
आपल्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा देणाऱ्या मराठी भाषिकांवर, मराठी भाषिक नेत्यांवर तिरकी नजर ठेवून आजवर कर्नाटक सरकार आपला डाव साधत आली आहे.
कायद्याने दिलेले हक्क, अधिकार फोल ठरवत कर्नाटकाने आपलीच हिटलरशाही पुढे रेटल्याचे आणखी एक उदाहरण शुभम शेळके यांच्यावर दाखल झालेल्या तक्रारीवरून पुढे येत असून कर्नाटक सरकारच्या जुलुमी कारवाईला ठोस उत्तर देण्यासाठी आता मराठी नेत्यांनी नाही तर मराठी भाषिकांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत सुज्ञ मराठीभाषिक व्यक्त करत आहेत.