बेळगाव लाईव्ह : सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
कोणत्याही जात, धर्म किंवा भाषेवर आधारित द्वेषपूर्ण किंवा समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट्स आणि कमेंट्स केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बणियांग यांनी दिला.
सध्या सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी माध्यम बनले आहे. मात्र, अनेकदा या माध्यमाचा गैरवापर करत समाजात द्वेष पसरवणाऱ्या पोस्ट्स आणि कमेंट्स केल्या जातात. यामुळे अनेक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो.
या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने नागरिकांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. पोलीस प्रशासनाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही प्रकारची जातीय, धार्मिक, भाषिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारची द्वेषमूलक किंवा समाजात फूट पाडणारी पोस्ट केल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
सोशल मीडियावर काहीही शेअर करण्यापूर्वी त्याचे परिणाम विचारात घ्यावेत, अन्यथा अशा नागरिकांवर कठोर कायदेशीर क्रम घेतला जाईल.
पोस्ट आणि टिप्पण्या करताना नागरिकांनी दक्षता बाळगावी, जेणेकरून शहरातील शांतता आणि सौहार्द कायम राहील. जर कोणाला कोणत्याही पोस्टवर आक्षेप असेल किंवा काही समस्या वाटत असेल, तर त्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्याऐवजी थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वर्तन करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही भडकावू किंवा समाजात अशांतता निर्माण करणाऱ्या पोस्ट टाळाव्यात आणि सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.