बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेतील ४२ नगरसेवकांनी आपल्या संपत्तीची बंधनकारक घोषणा केली असली, तरी १२ नगरसेवक अजूनही याबाबत अपयशी ठरले आहेत. कर्नाटक महानगरपालिका अधिनियम १९७६ नुसार, प्रत्येक नगरसेवकाने आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या मालमत्तेची माहिती निवडीनंतर एका महिन्यात आणि त्यानंतर दरवर्षी जाहीर करणे आवश्यक आहे.
बेळगाव महापालिकेच्या ५४ नगरसेवकांपैकी ४२ नगरसेवकांनी आपल्या संपत्तीची बंधनकारक घोषणा सादर केली आहे. मात्र, १२ नगरसेवकांनी अद्यापही ही माहिती महापालिकेकडे सादर केलेली नाही.
कर्नाटक महानगरपालिका अधिनियम १९७६ च्या कलम १९ (१) नुसार, प्रत्येक नगरसेवकाने आपल्या कुटुंबातील सदस्यांसह संपत्ती आणि मालमत्तेची माहिती निवडीनंतर एका महिन्यात जाहीर करणे आवश्यक आहे.
तसेच, दरवर्षी ही माहिती सुधारित करून सादर करावी लागते. नगरसेवकांनी संपत्ती जाहीर करणे हा पारदर्शक कारभाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे अद्याप संपत्ती विवरणपत्र सादर न करणाऱ्या १२ नगरसेवकांनी तातडीने ही माहिती महापालिकेकडे जमा करणे अनिवार्य आहे.
महापालिकेकडून संपत्ती जाहीर न करणाऱ्या नगरसेवकांना नोटिसा पाठवण्यात येऊ शकतात. तसेच, संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे सदर नगरसेवकांनी नियमानुसार आपली संपत्ती जाहीर करून पारदर्शकता राखणे नगरसेवकांसाठी फायद्याचे ठरणार आहे.