Tuesday, March 4, 2025

/

कार लांबवणारा भामटा गजाआड; 21 लाखांच्या चार कार जप्त

 belgaum

बेळगाव लाईव्ह:आपल्या वक्तृत्व कौशल्याने विश्वास संपादन करून अनेकांच्या कारगाड्या घेऊन त्या परत न करणाऱ्या एका सराईत भामट्याला मार्केट पोलिसांनी अटक केली असून त्याच्या जवळील विविध कंपन्यांच्या सुमारे 21 लाख 50 हजार रुपये किमतीच्या चार कार गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नांव महेश जगदीश पाटील (वय 32, रा. मूळचा बेनचीनमर्डी ता. बैलहोंगल, सध्या रा. ज्योतीनगर, कंग्राळी खुर्द) असे आहे. या प्रकरणाची माहिती अशी की, संगोळ्ळी रायण्णा सर्कल येथे मोहम्मद इजाज अब्दुल मुनीम सनदी यांच्याशी ओळख वाढवून त्यांच्या मालकीची महिंद्रा एक्सयुव्ही कार गेल्या 7 फेब्रुवारी रोजी महेश पाटील याने परगावी नेली.

कार घेऊन गेलेला महेश माघारी न परतल्याने सनदी यांनी त्याच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा मोबाईल स्विच ऑफ येत होता. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सनदी यांनी मार्केट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या प्रकरणासह महेश पाटील यांच्या विरोधात अशाच घटनेसंबंधी दाखल झालेल्या तक्रारींच्या आधारे बेळगाव शहर पोलीस आयुक्त, उपायुक्त तसेच गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महांतेश धामन्नावर यांच्या नेतृत्वाखाली मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शशीकुमार एस. कुरळे आणि गुन्हे विभागाच्या पोलीसांचे पथक नियुक्त करण्यात आले होते. या पथकाने तपासाची चक्रे फिरवून महेश जगदीश पाटील याला अटक केली. तसेच त्याच्याकडील एकूण 21 लाख 50 हजार रुपये किमतीच्या चार कार गाड्या जप्त केल्या आहेत.Market ps

पोलिसांनी जप्त केलेल्या कार गाड्यांमध्ये महिंद्रा एक्सयुव्ही 500 (क्र. केए 51 एमके 6364) -किंमत 7 लाख रुपये, टाटा झेड एक्सव्ही (क्र. एमएच 13 डीई 9744) -किंमत 5 लाख रुपये, स्विफ्ट डिझायर (एमएच 12 क्यूडब्ल्यू 4488) -किंमत 5 लाख 50 हजार रुपये व होंडा जाझ (क्र. एमएच 01 एआर 1274) -किंमत 4 लाख रुपये, अशा एकूण 21,50,000 रुपये किमतीच्या कार गाड्यांचा समावेश आहे.

सदर कारवाईबद्दल पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महांतेश धामन्नावर, पोलीस उपनिरीक्षक शशीकुमार कुरळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर शिंदे, एल. एस. कडोलकर, आय. ए. पाटील, नवीनकुमार ए. बी., सुरेश कांबळे, रमेश अक्की, एस. बी. खानापुरे यांचे कौतुक करून शाबासकी दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.