बेळगाव लाईव्ह : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर सीमा भागात महाराष्ट्र शासनाकडून समन्वय साधण्यासाठी चंद्रकांत दादा पाटील आणि शंभूराजे देसाई या दोन मंत्र्यांची समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपकडून मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि शिवसेने कडून शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
मागील मुख्यमंत्री शिंदे सरकारच्या कार्यकाळात देखील शंभूराज देसाई आणि चंद्रकांत दादा पाटील त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली होती तर चंद्रकांत दादा पाटील यांनी 2014 ते 18 या दरम्यान पाच वर्ष सीमा समान आहेत म्हणून काम केले होते.
शुक्रवारी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या दोन्ही मंत्र्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंदर्भात महाराष्ट्र शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दावा क्र.४/२००४ (Original Suit) दाखल केला आहे. सीमाप्रश्नी प्रभावी पाठपुरावा करुन विषयाला चालना मिळण्यासाठी, मा. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित दाव्यात नियुक्त वरिष्ठ वकील व सीमा भागातील मध्यवर्ती महाराष्ट्र एकिकरण समिती समवेत समन्वय साधणे, तसेच वादातीत सीमाभागातील मराठी भाषिक जनतेचे विविध प्रश्न सोडविणे, याकरीता वाचा येथील शासन निर्णयान्वये वेळोवेळी “समन्वयक मंत्री” यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र रराज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ नंतर नव्याने शासन अस्तित्वात आल्याने, सीमा प्रश्नासंदर्भात “समन्वयक मंत्री” नियुक्त करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
असा आहे शासन निर्णय
शासन निर्णय :-
महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या दाव्याचा प्रभावी पाठपुरावा करून विषयाला चालना देणे, मा. सर्वोच्च न्यायालयात दाखल दाव्यात शासनाची बाजू मांडण्यासाठी नियुक्त केलेले विधिज्ञ/ वरिष्ठ वकील आणि सीमा भागातील मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्यात समन्वय साधणे. तसेच, वादग्रस्त सीमा भागातील मराठी भाषिक जनतेचे विविध प्रश्न सोडविणे याकरिता, वाचा क्र.३ येथील शासन निर्णयान्वये चंद्रकांत (दादा) बच्चू पाटील, मा. मंत्री (उच्च व तंत्रशिक्षण, वस्रोद्योग व संसदीय कार्य) आणि श्री. शंभूराज शिवाजीराव देसाई, मा. मंत्री (राज्य उत्पादन शुल्क) या दोन तत्कालीन मंत्र्यांची महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासाठी “समन्वयक मंत्री (Nodal Minister)” म्हणून नियुक्ती करण्यात आली होती पुन्हा एकदा या दोन मंत्र्यांची या कामी नियुक्ती करण्यात आली आहे.