बेळगाव लाईव्ह : कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने मांडलेल्या 2025-26च्या बजेटवर भाजपाने तीव्र नाराजी व्यक्त केली. बेळगाव भाजपने राणी कित्तूर चन्नम्मा चौकात रास्ता रोको आंदोलन करत ट्रॅक्टर मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
काँग्रेस सरकारने मांडलेल्या बजेटमध्ये शेतकरी, ग्रामीण भाग आणि मागासवर्गीयांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुभाष एम.बी. जिरली यांनी केला. या बजेटमधून केवळ मुस्लिम समाजाला आकर्षित करण्याचे राजकारण करण्यात आले असून, शेतकऱ्यांसाठी कोणतेही ठोस निर्णय घेतलेले नाहीत, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रालाही पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ग्रामीण भागातील समस्या सोडवण्यासाठी कोणत्याही योजना नाहीत, असेही ते म्हणाले. माजी आमदार संजय पाटील, अनिल बेनके, आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते महांतेश दोड्डगौडर यांनीही काँग्रेस सरकारवर टीका केली.
शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या समाजांचे भविष्य धोक्यात आहे. ओबीसी समाजासाठी कोणत्याही योजना नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
या आंदोलनात जिल्हा प्रमुख गीता सुतार, मल्लिकार्जुन मादम्मनवर, संदीप देशपांडे, जगदीश बुदिहाळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.