बेळगाव लाईव्ह :प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर चाकू हल्ला करून तिचा खून केल्याची तसेच स्वतःलाही चाकूने वार करून संपवल्याची खळबळजनक घटना खासबाग सर्कल जवळील एका घरात आज मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. या भीषण घटनेमुळे संपूर्ण शहापूर हादरले आहे.
मयत दुर्दैवी युवतीचे नांव ऐश्वर्या लोहार (वय 19, रा. नवी गल्ली शहापूर) असे असून तिच्या प्रियकराचे नाव प्रशांत कुंडेकर (वय 29, रा. येळ्ळूर) असे आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत आणि ऐश्वर्या यांचे गेल्या वर्षभरापासून प्रेम प्रकरण सुरू होते. यातून वाद निर्माण होऊन प्रशांत याने आज दुपारी ऐश्वर्या हिला खासबाग सर्कल जवळील ओळखीच्या घरात एकांतात बोलावून घेतले. त्या ठिकाणी दोघांच्यात वादावादी होऊन त्याचे पर्यवसान प्रशांत कुंडेकर यांने धारदार चाकूने ऐश्वर्या हिच्यावर हल्ला करण्यामध्ये झाले. चाकूचा वार वर्मी लागल्याने घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळून ऐश्वर्या गतप्राण झाली.
ऐश्वर्याची हत्त्या केल्यानंतर स्वतःवरही चाकूचे वार करून घेत प्रशांत याने स्वतःला संपवले. त्यानंतर सायंकाळी घरी परतलेल्या संबंधित घरच्या मंडळींनी दार उघडून घरात प्रवेश करताच खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ऐश्वर्या व प्रशांत यांचे मृतदेह त्यांच्या निदर्शनास आले. मृतदेह पाहून मोठा धक्का बसलेल्या त्या मंडळींनी त्वरित घटनेची माहिती शहापूर पोलिसांना दिली. तेंव्हा शहापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून ऐश्वर्या व प्रशांत यांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवले आहेत.
पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी देखील घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. सदर भीषण घटनेमुळे परिसरात खळबळ उडून संपूर्ण शहापूर हादरले आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे. या प्रभागाचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली.