बेळगाव लाईव्ह :कर्नाटक आणि गोवा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असणाऱ्या बेळगाव -चोर्ला रस्त्याचे बहुप्रतिक्षित डांबरीकरणाचे काम वेगाने सुरू झाले असून पहिल्या टप्प्यात कुसमळी ते चोर्ला हा भाग पूर्ण झाला आहे. आता कुसमळी ते रणकुंडये हा उर्वरित रस्ता पुढील दोन महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून (एनएचएआय) रणकुंडये ते चोर्ला या भागाचे डांबरीकरण करताना टिकाऊपणा वाढवा यासाठी दुहेरी कोटिंग केले जाणार आहे. कणकुंबी येथे कर्नाटक राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते गेल्या 24 फेब्रुवारी 2024 रोजी या रस्त्याचे काम अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आले. ज्यामुळे पायाभूत सुविधांच्या एका महत्त्वाच्या सुधारणेची सुरुवात झाली. या प्रकल्पाची अंमलबजावणी हुबळी येथील एमबी कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करत असून ज्यांनी सध्या आपले काम जलद गतीने सुरू केले आहे. तथापि प्रारंभी कणकुंबी वन विभागाकडून या प्रकल्पाला विरोध झाल्यामुळे रस्त्याचे काम तात्पुरते थांबले होते. तेंव्हा आमदार विठ्ठल हलगेकर यांनी हस्तक्षेप करून समस्येचे निराकरण करण्यासाठी उपवनसंरक्षकांशी चर्चा केली. पावसाळ्यात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी, कणकुंबी -चोर्ला मार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे दुरुस्त करून प्रवाशांना तात्पुरती सुविधा उपलब्ध करण्यात आली. एमबी कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीशी संलग्न पर्यवेक्षक संदीप कालेकर यांनी कुसमळी पुलापर्यंतचे रस्ता डांबरीकरणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. नवीन पुलाचे बांधकाम प्रगतीपथावर असून येत्या एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ते पूर्ण होईल, अशी माहिती दिली.
प्रमुख रस्ते सुधारणा आणि गुंतवणूक : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बेळगाव -चोर्ला -पणजी महामार्गाचा भाग असलेल्या आता राष्ट्रीय महामार्ग 748एए म्हणून ओळखल्या जात असलेल्या रणकुंडये ते चोर्ला या 43.5 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यास मान्यता दिली आहे. दोन टप्प्यात विभागल्या गेलेल्या या प्रकल्पाचे कंत्राट एमबी कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने मिळवले आहे.
कंत्राटदाराने गेल्या ऑक्टोबर -नोव्हेंबर 2023 मध्ये काम सुरू केले आणि पुढील दोन महिन्यांत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पाचे एकूण मूल्य अंदाजे 58.90 कोटी रुपये असून ज्यासाठी एमबी कल्लूर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने 35.30 कोटी रुपयांची निविदा घेतली आहे. रणकुंडये ते चोर्ला या 26.130 कि.मी. ते 69.480 कि.मी. लांबीच्या रस्त्याचे पूर्णपणे डांबरीकरण केला जाणार आहे. ज्यामुळे बेळगाव आणि गोवा यांच्यातील संपर्कात लक्षणीय सुधारणा होईल.
कुसमळीचा ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पूल बदलण्यात आला : कुसमळी येथील मलप्रभा नदीवरील 150 वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल संरचनात्मकदृष्ट्या कमकुवत झाला असल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. नवीन पुलासाठी स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला नसला तरी, सरकारने रस्त्याच्या डांबरीकरणाच्या बजेटमधून त्याच्या बांधकामासाठी निधी वळवला आहे. हा 90 मीटर लांब आणि 5.5 मीटर रुंदीचा पूल एनएचएआयच्या देखरेखीखाली बांधला जाणार आहे. पुलाचे बांधकाम सुरू असताना वाहतूक सुरळीत रहावी यासाठी सध्या नदीत मातीचा भराव टाकून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला आहे. जुना पूल पाडण्यात आला असून येत्या पावसाळ्यापूर्वी नवीन पूल पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
चोर्ला रोड दुपदरीकरण प्रकल्प रद्द : वाढत्या वाहतूक कोंडीमुळे एनएचएआयने चोर्ला रोडचे रुंदीकरण दुपदरी महामार्ग करण्यासाठी 279 कोटी रुपये मंजूर केले होते. तथापि पर्यावरण गट आणि वन विभागाच्या विरोधामुळे हा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. इंधनाचा वापर आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी दुपदरीकरणाचे धोरणात्मक महत्त्व असूनही पर्यावरणीय चिंतेमुळे हा प्रकल्प पुढे सरकू शकला नाही. गेल्या 5 ते 6 वर्षांतील चोर्ला रस्त्याच्या खराब स्थितीमुळे असंख्य अपघात आणि मृत्यू झाले असल्यामुळे त्याची तातडीने दुरुस्ती होणे गरजेचे होते. सध्या सुरू असलेल्या डांबरीकरणाच्या कामामुळे वाहनांचा वेग वाढण्याची अपेक्षा असली तरी रस्त्यावरील धोकादायक वळणे ही चिंतेची बाब आहे.
चोर्ला रस्त्यावर अवजड वाहतुक बंदी : रस्ते आणि पूल बांधकाम सुरळीत पार पाडण्यासाठी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगाव -चोर्ला -गोवा मार्गावर प्रकल्प पूर्ण होईपर्यंत आंतरराज्य अवजड वाहतुकीवर बंदी घातली आहे. अवजड वाहने बांधकाम कामांमध्ये अडथळा आणत असल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. रस्त्याच्या सुधारणा प्रक्रियेमुळे प्रवाशांना लवकरच बेळगाव आणि गोवा दरम्यान सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची अपेक्षा करता येईल. या प्रकल्पाच्या पूर्णतेमुळे प्रादेशिक संपर्क वाढून दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होणार आहे.