बेळगाव लाईव्ह : बेळगावहून धारवाडच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर बडेकोळ मठ घाटात भीषण अपघात घडला. एकापाठोपाठ एक अशा सात वाहने एकमेकांवर आदळली. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कंटेनर पलटी झाल्याने महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
बेळगाव-धारवाड महामार्गावर बडेकोळ मठ घाटात मंगळवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास सात वाहनांचा भीषण अपघात घडला. एका वाहनाच्या अचानक ब्रेक लागल्याने मागून येणाऱ्या वाहनांना वेगावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आणि एकापाठोपाठ एक गाड्या एकमेकांवर धडकल्या.
या अपघातात मारुती सुझुकी कार वाहून नेणारा कंटेनर पलटी झाला. त्याच्याच मागून येणाऱ्या तीन बस, दोन ट्रक आणि एका गॅस टँकरला जबर धक्के बसले. सुदैवाने गॅस टँकर पलटी झाला नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. अपघात इतका भीषण होता की वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
कंटेनरच्या चालकाला किरकोळ दुखापत झाली असून, या अपघातात दोन दुचाकीस्वारांचाही समावेश आहे. मात्र, सुदैवाने ते दोघेही थोडक्यात बचावले आहेत. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडीचे पीएसआय अविनाश आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना केल्या.
या अपघातामुळे महामार्गावरील वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. दरम्यान, पोलिसांनी क्रेनच्या मदतीने पलटी झालेला कंटेनर बाजूला करण्याचे काम हाती घेतले. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून ती सुरळीत केली.