बेळगाव लाईव्ह :बेळगाव तालुक्यातील कलखांब आणि मुचंडी ग्रामपंचायतीकडून सन 2024 -25 सालामध्ये मनरेगा योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहणी करून सदर काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची सूचना बेळगाव जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी केली.
तालुक्यातील कलखांब ग्रामपंचायतीला काल मंगळवारी दिलेल्या आपल्या भेटीप्रसंगी जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी तेथील कामकाजाची स्वतः जातीने पाहणी केली. तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेळेवर कामावर हजर होऊन कर्तव्यदक्षतेने आपले काम करण्याची सूचना केली.
विधानसभा मतदारसंघाच्या व्याप्तीतील ग्रामीण रस्ते कामाच्या योजनेअंतर्गत 2023 -24 मध्ये मंजूर झालेल्या 40 लाख रुपयांच्या अनुदानातून हाती घेण्यात आलेल्या सीसी रस्ते, गटारी आणि पेव्हर्स रस्ते या विकास कामांच्या प्रगतीची त्यांनी पाहणी केली.
ग्रामपंचायत हद्दीतील विश्वेश्वरय्यानगर येथे 179 लाख रुपयांच्या अनुदानातून उभारण्यात येत असलेल्या बागायत उपसंचालक आणि वरिष्ठ सहाय्यक संचालकांसाठीच्या इमारतीच्या कामाची देखील जि. प. सीईओ शिंदे यांनी पाहणी केली.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्यांसह कार्यकारी अभियंता सुधीर बी. कोळी, सहाय्यक कार्यकारी अभियंता बी. एम, बन्नूर, पीडीओ गोपाळ गोडसे यांच्यासह तांत्रिक सहाय्यक आणि ग्रा.पं. कर्मचारी उपस्थित होते.