Wednesday, February 12, 2025

/

बेळगावपर्यंत वंदे भारत रेल्वेच्या विस्ताराला हिरवा कंदील

 belgaum

बेळगाव लाईव्ह :सध्या बेंगलोर आणि धारवाड दरम्यान सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सेवा बेळगाव शहरापर्यंत वाढवण्यास हिरवा कंदील मिळाला असून नवीन वेळापत्रकानुसार लवकरच बेळगाव येथून ही नवी रेल्वे सेवा सुरू केली जाईल, अशी माहिती बेळगावचे खासदार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी दिली.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची त्यांच्या संसदीय कार्यालयात बेळगाव खासदार जगदीश शेट्टर यांच्यासोबत भेट घेतली आणि वंदे भारत एक्सप्रेस बेळगावपर्यंत वाढवण्याच्या दीर्घकाळापासूनच्या मागणीवर चर्चा केली.

तत्पूर्वी, राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी आणि बेळगावचे आमदार अभय पाटील यांनीही वंदे भारतच्या विस्तारीकरणासाठी औपचारिक विनंती सादर केली होती. काही दिवसांपूर्वी, मंत्री जोशी यांनी हुबळी येथील त्यांच्या लोकसभा मतदारसंघ कार्यालयात नैऋत्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महाव्यवस्थापक, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) आणि इतर प्रमुख प्रतिनिधींसोबत बैठक बोलावली होती.

बैठकीदरम्यान, त्यांनी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सकाळी बेळगावहून निघावी, पोचून रात्री परत यावी, असा प्रस्ताव मांडला होता.

तांत्रिक व्यवहार्यतेचा आढावा घेतल्यानंतर आणि रेल्वे विभागाच्या अहवालाचे विश्लेषण केल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना बेळगाव आणि बेंगलोर दरम्यान लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावेल याची पुष्टी केली. “यामुळे बेळगाव आणि हुबळी-धारवाडच्या लोकांसाठी प्रवास सोयींमध्ये लक्षणीय सुधारणा होईल,” असे मंत्री जोशी म्हणाले.

तसेच विनंतीला मान्यता दिल्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. बेळगाव -बेंगलोर वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे.

दरम्यान, सध्या हुबळी ते पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे धावत आहे. हुबळीतून आठवड्यातून तीन वेळा व पुण्यातून तीन वेळा असे सहा दिवस ही रेल्वे धावते. त्याप्रमाणेच बेळगाव ते बेंगलोर दरम्यान होणारी गर्दी लक्षात घेऊन या मार्गावर रोजच ‘वंदे भारत’ सुरू करावी अशी मागणीही जोर धरत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.