बेळगाव लाईव्ह : बसवेश्वर सर्कल, गोवावेस येथील वादग्रस्त खाऊ कट्टा प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या दोन नगरसेवकांना दोषी मानून दोन्ही नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा आदेश प्रादेशिक आयुक्तांनी बजावला आहे.
बेळगावचे प्रादेशिक आयुक्त संजीवकुमार शेट्टन्नावर यांनी सदर सुनावणी केली असून या प्रकरणी नगरसेवक जयंत जाधव व नगरसेवक मंगेश पवार यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. कर्नाटक महानगरपालिका कायद्यानुसार खाऊ कट्टा येथील गाळे बेकायदेशीर पद्धतीने हडप करण्यात आल्याचे सुनावणीतदरम्यान सिद्ध झाले असून केएमसी ऍक्ट नुसार लाभाचे पद घेता येत नाही, निवडणूक लढवून विजयी झाल्यानंतर अशी पदे सोडून देणे गरजेचे आहे. मात्र तसे न झाल्याचे आढळून आले असून यासंदर्भातील सर्व दोषारोपपत्र तसेच कागदपत्रांची पडताळणी करून, जबाब नोंदवून प्रादेशिक आयुक्तांनी सदर निर्णय दिला आहे.
महानगरपालिका कायदा-१९७६ च्या कलम २६ च्या उपकलम (१)(के) नुसार, सदर आरोपी सदस्यांना महानगरपालिकेच्या नगरसेवकांच्या सदस्यत्वातून अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खाऊ कट्टासंदर्भातील गेल्या अनेक दिवसांपासून संबंधितांची चौकशी सुरु होती. दरम्यान सोमवारी प्रादेशिक आयुक्तांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणीत दोन्ही नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करण्यात यावे, असा आदेश देण्यात आला आहे. खाऊ कट्टा येथील दुकानांचे गाळे हे रस्त्यावर किरकोळ भाजीपाला, साहित्याची विक्री करणाऱ्या गोरगरीब, विधवा महिलांना व अनुसूचित जाती -जमातीच्या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले होते.
मात्र नगरसेवकांनी बेकायदेशीर पद्धतीने येथील गाळे हडप केल्याने सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. खाऊ कट्टा येथील गाळे बेकायदेशीर पद्धतीने हडप करण्यात आल्याने अनेक गरिबांवर अन्याय झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. कांही नगरसेवकांनी राजकीय प्रभाव वापरून खाऊ कट्टा येथील दुकानांचे गाळे हडपून नगरसेवक मंगेश पवार यांनी आपली पत्नी नीता पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांनी आपली पत्नी सोनाली जाधव याच्या नावे हे गाळे घेतले होते.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारींवर अनेकवेळा सुनावणी झाली होती. आज अखेर सर्व कागदपत्रांची पडताळणी आणि दाखल्यांसहित प्रादेशिक आयुक्तांनी सुनावणी करत नियमानुसार दोन्ही नगरसेवकांचे पद रद्द करण्यात यावे, असे आदेश बजावले आहेत. ते नगरसेवक पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
येत्या १४ फेब्रुवारी रोजी बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांचा कार्यकाळ संपुष्टात येणार असून एकीकडे निवडणुकीच्या दृष्टीने जोरदार तयारी सुरु असतानाच सत्ताधारी पक्षातील दोन नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आल्याने सत्ताधारी पक्षाला याचा फटका बसण्याची शक्यता आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे.