बेळगाव लाईव्ह : राज्य सरकारने खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्यात वन्यजीव सफारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला पर्यावरण प्रेमींकडून तीव्र विरोध होत असून, यामुळे जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण होईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पर्यटन मंत्री एच. के. पाटील यांनी काही दिवसांपूर्वी खानापूरमधील भीमगड अभयारण्यात १८ किलोमीटरचा परिसर वन्यजीव सफारीसाठी खुला करण्याची घोषणा केली. हा निर्णय बेळगाव जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देणारा ठरेल, असा दावा सरकारने केला आहे.
मात्र, पर्यावरण प्रेमी आणि तज्ज्ञांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. संपूर्ण १९,०४२.५ हेक्टरमध्ये पसरलेल्या या अभयारण्यात वाघांसह अनेक दुर्मिळ वन्यजीवांचा वावर असून, हे क्षेत्र संरक्षित आहे. मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी येथे प्रवेशावर निर्बंध लादले आहेत.
याशिवाय, या अभयारण्यात १३ वाड्यांमध्ये ३,००० हून अधिक लोक अनेक दशकांपासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहत आहेत. त्यांना योग्य रस्ते, शाळा, आरोग्य सुविधा आणि मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. २०११ मध्ये केंद्र सरकारने भीमगड वनक्षेत्राला अभयारण्य म्हणून घोषित केल्यानंतर, येथे कोणत्याही प्रकारच्या विकासकामांवर वन विभागाने निर्बंध घातले सरकारच्या या निर्णयामुळे जंगलात मानवी हालचाली वाढतील, व्यावसायिक पर्यटनाला चालना मिळेल आणि रस्ते, हॉटेल तसेच इतर सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची शक्यता आहे.
परिणामी, वन्यजीवांना धोका निर्माण होईल आणि येथील नाजूक पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर, माजी लष्करी अधिकारी आणि पर्यावरण प्रेमी कर्नल रवींद्र सैनी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, आम्ही सात पर्यावरण प्रेमींनी एकत्र येऊन सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा हा निर्णय अनपेक्षित असून, अधिक धक्कादायक म्हणजे वन विभागाने याला परवानगी कशी दिली? सध्या भीमगड अभयारण्य सर्वसामान्य जनतेसाठी बंद आहे.
मात्र, जर सफारीस परवानगी दिली गेली, तर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचा ओघ वाढेल. परिणामी, जंगलात मानवी हस्तक्षेप वाढेल, पर्यावरणाचा ऱ्हास होईल आणि वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिला आहे.