बेळगाव लाईव्ह :मागील तीन वर्षात म्हणजे 2021 ते 2023 या कालावधीमध्ये बेळगाव जिल्ह्यात 16 सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे, तर राज्यात या कालखंडात एकूण 328 शासकीय कर्मचाऱ्यांनी स्वतःहून आपले जीवन संपवले आहे. राज्यातील सर्वाधिक आत्महत्या राजधानी बेंगलोर येथे नोंद झाल्या आहेत.
बेंगलोर खालोखाल म्हैसूर शहर, बेळगाव, हुबळी – धारवाड जिल्ह्यात प्रत्येकी 16 जणांनी आत्महत्या केली आहे. याखेरीज गुलबर्गा शहर, गदग, हासन, तुमकुर आणि कर्नाटक रेल्वे विभागात प्रत्येकी 12 जणांनी, बागलकोट आणि कारभारमध्ये प्रत्येकी 11 जणांनी, तर बंगलोर ग्रामीण व उडपी येथे प्रत्येकी 10 जणांनी आत्महत्या केली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये हा आकडा एक अंकी आहे. बेंगलोर शहरात सर्वाधिक 13 पोलिसांनी आत्महत्या केली आहे.
बेळगावमध्ये अलीकडेच म्हणजे गेल्या नोव्हेंबर -2024 मध्ये बेळगाव तहसिलदार कार्यालयातील द्वितीय सहाय्यक श्रेणीचे अधिकारी (एसडीए) रुद्रेश येडवणावर यांनी तहसील कार्यालयांमध्येच गळफास घेऊन जीवन संपवले. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमुख कारण कामाचा ताण, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा अपमान, आदेश पाळण्याची सक्ती, भ्रष्टाचारात अडकण्याची स्थिती, आवश्यकतेवेळी सुट्टी न मिळणे आदी आहेत.
मागील तीन वर्षांवर दृष्टिक्षेप टाकला असता राज्यात 2021 मध्ये 115, 2022 मध्ये 96 आणि 2023 मध्ये 117 सरकारी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या नोंद झाल्या आहेत. बेळगाव जिल्हासह राज्यात आत्महत्या करणाऱ्यांमध्ये लिपिक, लेखापाल आणि कनिष्ठ कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.