बेळगाव लाईव्ह :घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना सरस्वतीनगर, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी येथे आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी अंदाजे 250 ग्रॅम सोने, 40,000 रुपये रोख आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्याचा अंदाज आहे.
चोरट्यांनी डल्ला मारलेले घर अँथनी डिक्रूझ यांच्या मालकीचे असून ते सध्या राजस्थानमध्ये आहेत. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अल्ताफ मुल्ला आणि पथकाने घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्याद्वारे तपास कार्य हाती घेतले आहे.
यावेळी ठसे तज्ञांसह पोलीस श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी अधिकाऱ्यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळाची कसून तपासणी केली आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पुरावे गोळा केले आहेत. भरवस्तीतील घरफोडीच्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांबद्दल रहिवाशांनी चिंता व्यक्त करण्याबरोबरच कायद्याची अंमलबजावणी करत असताना निवासी भागात सुरक्षा उपाय वाढविण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी देखील चोरीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे तसेच प्रवासासाठी घराबाहेर पडताना आपले शेजारी व इतरांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.