बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांसाठी जीवनदायिनी असलेल्या हिडकल जलाशयातील पाणी हुबळी-धारवाड औद्योगिक वसाहतीला वळवण्याचा सरकारचा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी जिल्ह्यातील विविध संघटनांनी केली आहे. या निर्णयाच्या विरोधात जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्याला जलपुरवठा करणाऱ्या हिडकल जलाशयातील पाणी हुबळी-धारवाड औद्योगिक वसाहतीला वळवण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शवत विविध संघटनांनी सोमवारी जिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना सांगितले कि, “पाणी पिणाऱ्यांचा हक्क प्राधान्याने मान्य केला पाहिजे. त्यानंतर शेतकऱ्यांचा आणि शेवटी उद्योगधंद्यांचा विचार होतो. सध्या बेळगाव शहरात आठ दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो.
या परिस्थितीत हिडकलचे पाणी औद्योगिक वसाहतीला वळविण्याचा सरकारचा निर्णय अन्यायकारक आहे. घटप्रभा नदीचे पाणी मलप्रभा औद्योगिक क्षेत्रासाठी वापरण्याचा प्रयत्न हा बेळगाव आणि घटप्रभा नदीकाठच्या नागरिकांच्या विरोधात असून, हा प्रकल्प रद्द न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल.” तसेच, “जर हा अन्याय थांबवला नाही, तर बेळगाव बंद पुकारले जाईल आणि यासाठी संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील,” असा इशाराही त्यांनी दिला.
सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद यांनी सांगितले की, हिडकल जलाशयातील पाणी चिकोडी, हुक्केरी, रायबाग, मुधोळ, महालिंगपूर, संकेश्वर आणि बागलकोटपर्यंत पुरवले जाते. यातील २०% पाणी बेळगाव शहरासाठी आणि उर्वरित भाग शेतकऱ्यांसाठी वापरले जाते. जर हे पाणी हुबळी-धारवाडकडे वळवले गेले, तर पाणीटंचाईची स्थिती आणखी गंभीर होईल.
या आंदोलनाला जिल्ह्यातील अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. सरकारने हा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे राहील आणि त्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.