बेळगाव लाईव्ह : बाळेकुंद्री खुर्द येथे बस प्रवासादरम्यान युवतीला कन्नड भाषेत प्रश्न विचारत बस वाहकाने शिवीगाळ केली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला धारेवर धरले. मात्र, या घटनेला भाषिक वादाचा रंग देण्याचा कन्नड संघटनांचा प्रयत्न सुरू असून, कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून समाजात तणाव निर्माण करण्याचा डाव रचला जात आहे.
घडल्या प्रकारचा आणि कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांचा मी जाहीर निषेध करत असून दोन्ही राज्यातील शांतता, कायदा – सुव्यवस्था बिघडवायची नसेल तर हा प्रकार इथेच थांबणे गरजेचे आहे असे मत महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांनी व्यक्त केले.
बाळेकुंद्री खुर्द येथे परिवहन बसमध्ये एका मराठी भाषिक युवतीला ‘कन्नड येत नसेल तर कर्नाटकात का राहतेस?’ असा प्रश्न विचारत बस वाहकाने शिवीगाळ केल्याची घटना घडली. त्यावर संतप्त नागरिकांनी बस वाहकाला जाब विचारला.
मात्र, या घटनेला वेगळा रंग देत बस वाहकाने मराठी भाषिक प्रवाशांनी आपल्याला मारहाण केल्याचा खोटा आरोप लावला. या घटनेनंतर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र परिवहनची बस अडवली. बस चालकाला जबरदस्तीने कन्नड भाषेचे ज्ञान आहे का, असे विचारण्यात आले. त्याने कन्नड येत नसल्याचे सांगताच, कार्यकर्त्यांनी त्याला काळे फासले. या प्रकारामुळे महाराष्ट्रातही संतापाची लाट उसळली.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटक परिवहनच्या बस अडवून निषेध नोंदविला आणि कर्नाटक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावर प्रतिक्रिया देताना शुभम शेळके यांनी सांगितले की, “बसमध्ये घडलेल्या मारहाणीच्या प्रकाराचे आम्ही समर्थन करत नाही, परंतु कन्नड रक्षण वेदिकेच्या तथाकथित कार्यकर्त्यांकडून समाजात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न सुरू आहे. बेळगावच्या शांततेला बाधा आणण्याचा हा कट आहे.
जर अशीच घटना कन्नड भाषिक तरुणीसोबत घडली असती, तर मराठी भाषिक तिच्या बाजूने उभा राहिला असता. मात्र, कन्नड संघटनांचे कार्यकर्ते समाजाला लागलेली कीड असून, त्यांच्या भूमिकेवरून ते अशा घटनांना पाठिंबा देतात, असे स्पष्ट होत आहे. अशा नालायक लोकांना वाव देण्याचे काम कन्नड संघटना करत आहेत. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी हा प्रकार इथेच थांबवावा. पोलीस प्रशासनाने तातडीने या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, असेही ते म्हणाले.
दरम्यान, बस वाहकाविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे दोन्ही राज्यांमध्ये तणाव निर्माण झाला असून, पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर यावर ठोस कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.