बेळगाव लाईव्ह :श्री संगोळ्ळी रायण्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह व सौहार्द सहकारी सोसायटी आणि श्री बसवेश्वर सौहार्द सहकारी नियमित सोसायटीमधील आमच्या ठेवी आम्हाला परत मिळवून द्याव्यात.
तसेच बेळगाव येथे केपीआयडी आणि डीआरटी प्राधिकार स्थापनेत यावे, अशी मागणी दोन्ही सोसायटीच्या ठेवीदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
श्री संगोळ्ळी रायण्णा अर्बन को-ऑपरेटिव्ह व सौहार्द सहकारी सोसायटी आणि श्री बसवेश्वर सौहार्द सहकारी नियमित सोसायटीच्या ठेवीदारांनी आज उपरोक्त मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून त्वरेने पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
बेळगाव येथील श्री संगोळी रायण्णा सोसायटीच्या कथीत 400 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ठेवीदारांना अर्ज दाखल करण्याचे आवाहन गेल्या नोव्हेंबर 2023 मध्ये करण्यात आले होते. त्यानुसार बेंगलोर येथे जाऊन ठेवीदाराने अर्ज दाखल केले होते. तथापी आपल्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदारांनी दाखल केलेले अर्ज सक्षम प्राधिकरण (केपीआयडी) तथा विशेष अधिकाऱ्यांकडून फेटाळण्यात आले आहेत.
बेळगावातील अनेक ठेवीदारांना विशेष अधिकारी तथा सक्षम प्राधिकरणाच्या बेंगलोर येथील कार्यालयाकडून त्याबाबतचे पत्र पाठवण्यात आल्यामुळे ठेवीदारांची चिंता वाढली आहे. त्यामुळे या संदर्भात आता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार दोन्ही सोसायटीच्या ठेवीदारांनी आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले. सदर निवेदनात ठेवीदारांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती नमूद असून ठेवी परत मिळवून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात बेळगाव लाईव्हशी बोलताना ठेवीदारांच्या वकील ॲड. ज्योती पाटील यांनी कशाप्रकारे ठेवीदारांचे अर्ज फेटाळण्यात आले याची थोडक्यात माहिती दिली. ठेवी परत करण्यासाठी केपीआयडी कायद्याच्या कलम 7(2) नुसार पुरावे समाधानकारक नसण्याच्या कारणास्तव ठेवीदारांचे अर्ज फेटाळण्यात आले आहेत. खरंतर ठेव परत मिळण्यासाठी ठेवीदारांकडील त्यांच्या कायम ठेवीची (फिक्स डिपॉझिट) पावती योग्य पुरावा म्हणून पुरेशी आहे असे हे कलम सांगते.
मात्र हा पुरावा पुरेसा नसल्याचे या घोटाळ्यात प्रकरणी नियुक्त विशेष अधिकारी सांगत आहेत परिणामी सर्व ठेवीदारांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत. यामुळे ठेवीदारांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे असे सांगून यासाठी सर्व संत्रस्त ठेवीदारांनी येत्या 3 मार्च 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती ॲड. ज्योती पाटील यांनी दिली. याप्रसंगी स्त्री -पुरुष ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.