बेळगाव लाईव्ह :सराई चोरट्यांनी गॅस कटरने अवघ्या 7 मिनिटात एसबीआय बँकेचे एटीएम फोडून हजारो रुपये लंपास केल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी सकाळी बेळगाव शहराजवळील सांबरा गावात उघडकीस आली आहे.
सांबरा (ता. जि. बेळगाव) गावात काल मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या चोरीप्रसंगी चोरट्यांनी प्रथम एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे मारला आणि त्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने एटीएमचे झाकण तोडून आतील हजारो रुपये लंपास केले. मारीहाळ पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडलेल्या या चोरीची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
त्याचप्रमाणे बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टीन मार्बन्यांग यांनी देखील सांबरा गावातील एसबीआयच्या त्या एटीएम मशीनच्या ठिकाणी भेट देऊन सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे गोष्टींची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांबरा येथील एसबीआयच्या एटीएम मधून 75 हजार 600 रुपयांची चोरी झाल्याचे त्यांनी सांगितले. सीसीटीव्ही कॅमेरा वर स्प्रे मारण्यात आला असला तरी त्यामध्ये चेहऱ्यावर मास्क घातलेल्या तीन चोरट्यांची छबी कैद झाली आहे.
या चोरट्यांना गजाआड करण्यासाठी तीन विशेष पोलीस पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती पोलीस आयुक्त मार्बन्यांग यांनी दिली. बँक अधिकाऱ्यांनी या एटीएमच्या ठिकाणी चांगली सुरक्षा व्यवस्था ठेवावयास हवी होती.
त्यांच्या दुर्लक्षाचा हा परिणाम आहे की अवघ्या पाच मिनिटात एटीएम फोडण्यात आले असे सांगून चोरटे कुठून आले? कोणत्या दिशेला गेले? हे सध्या समजू शकले नसले तरी पोलीस त्यांना लवकरच गजाआड करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.