बेळगाव लाईव्ह :सध्या पैशाने जग जिंकता येते, अशी मानसिकता तयार होत आहे. काळ कितीही बदलला तरी महात्मा गांधी, साने गुरुर्जीच्या विचारांची उंची कधीच कमी होणार नाही. पुरोगामी विचारांशी जुळून घेतले तरच देश मोठा होणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.
प्रगतिशील लेखक संघातर्फे आयोजित चौथ्या मराठी साहित्य संमेलनात उद्घाटन करून ते बोलत होते. भावे यांच्या हस्ते प्रसिद्ध साहित्यिक प्रेमचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
भावे म्हणाले, प्रगतिशील लेखक संघातर्फे एका व्यक्तीला संमेलन समर्पित करण्याची संकल्पना खूप मोठी आहे. महात्मा गांधी, शाहीर लुधियानवी, साने गुरुजी अशा व्यक्तित्वांचा जागर केल्याने खूप काही गवसते. १९४९ मध्ये डॉ. आंबेडकरांनी राज्यघटना समर्पित करताना लोकशाहीत एक दिवस हुकूमशाही जन्माला येईल अशी भीती वाटते असे म्हटले होते. सध्या याची प्रचितीसुद्धा येते.
साने गुरुजी यांनी श्रमिककष्टकऱ्यांचे नेतृत्व केले. दिल्ली येथे झालेल्या विश्व साहित्य संमेलनात साने गुरुजींची साधी आठवणसुद्धा काढण्यात आली नाही. जो माणूस कणाकणाने झिजला, त्या साने गुरुजींचे योगदान खूप मोठे आहे. समाजातील सामान्य माणसे ही देशातील खरी माणसे आहेत. ९० टक्के श्रमिक-कामगार लोक देश चालवतात. महात्मा गांर्धीचे विचार ६०० विद्यापीठात शिकवले जातात. आजही महात्मा गांधी, साने गुरुजी यांचे विचार तितकेच मोलाचे वाटतात, असे सांगितले.
साने गुरुजी बंडखोर व लढाऊ होते. ‘खरा तो एकचि धर्म’ आणि ‘आता उठवू सारे रान’ या दोन गाण्यांचा भावार्थ म्हणजे साने गुरुजीचे जीवन होते. ते अस्सल समाजवादी होते. माणसांनी माणसाला माणसासारखे वागवले पाहिजे, त्यांचे शोषण होऊ नये अशी त्यांची धारणा होती. खरा समाज निर्माण करायचा असेल तर तो मानवतेच्या ओलाव्यातूनच होऊ शकतो, असे प्रतिपादन श्रमिक मुक्ती दलाचे नेते व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भारत पाटणकर यांनी केले.
प्रगतिशील लेखक संघ बेळगाव आयोजित तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथील कॉ. कृष्णा मेणसे साहित्यनगरीत ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे सभा मंडपात झालेल्या चौथ्या मराठी साहित्य संमेलनात ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते.
डॉ. पाटणकर म्हणाले, साने गुरुजींच्या तत्त्वज्ञानाचा गाभा महात्मा गांर्धपिक्षा वेगळा होता.महात्मा गांधीच्या विचारात जाती संपवणे ही मागणी नव्हती. साने गुरुजींना मात्र जाती संपविण्यासह कामगार व स्त्रीमुक्ती अभिप्रेत होती. शोषण करणारे आणि शोषण होणारे या दोन्ही घटकाकडे ते संवेदनशीलतेने पाहत असत. संगोपनातून माया निर्माण होते. त्यामुळे पुरुषांनी खीसारखे बनण्याचे ध्येय पाहिजे, असा विचार साने गुरुजींच्या साहित्यात होता. साने गुरुजींची प्रतिभा हळव्या, प्रेमळ माणसाची होती. अश्रू व करणा या गोष्टी माणसाला ताकदवान बनवू शकतात, हे साने गुरुजींनी जाणले होते. तत्कालीन काळात शोषणमुक्त होण्यासाठी हिंसा करावी लागेल, असा विचार काहींनी मांडला होता. हा विचार साने गुरुजींना मान्य नव्हता, क्रांतिकारक बदलाचे साधन हिंसा असू शकत नाही. हिंसा ही शोषणाचे संबंध नष्ट करत नाही. नवा समाज हिंसेतून उत्पन्न होत नाही.