बेळगाव लाइव्ह :बाजारामध्ये नवनवीन अत्याधुनिक वाहने उपलब्ध होऊ लागल्यामुळे वाहन खरेदीमध्ये प्रचंड वाढ झाली असून पर्यायाने आरटीओ कडील वाढलेल्या वाहन नोंदणीच्या ओघामुळे सरकारला विक्रमी महसूल उपलब्ध होत आहे. गेल्या दोन वर्षात बेळगाव जिल्ह्यात 1 लाख 87 हजार 181 वाहने नोंद झाली आहेत.
बेळगाव बेळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 6 प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आहेत. या कार्यालयांमध्ये गेल्या एप्रिल 2023 ते मार्च 2024 पर्यंत 19 हजार 308 नवीन वाहनांची नोंद झाली, तर एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत 87हार 873 वाहनांची नोंदणी केली गेली. या पद्धतीने मागील दोन वर्षात 1 लाख 87 हजार 181 वाहनांची नोंदणी झाल्यामुळे बेळगाव, बैलहोंगल, चिक्कोडी, गोकाक, अथणी व रामदुर्ग येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या महसुलात लक्षणीय वाढ झाली असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून उपलब्ध झाली आहे.
बेळगावचे आरटीओ नागेश मुंडास यांनी दिलेल्या माहितीनुसार आरटीओ कार्यालया अंतर्गत गेल्या दोन वर्षात मोठा महसूल मिळाला असून वाहन नोंदणीचे प्रमाण वाढल्यामुळे दोन्ही वर्षांमध्ये अनुक्रमे 90.69 टक्के आणि 90.91 टक्के उद्दिष्ट गाठण्यात आले आहे. बेळगाव जिल्ह्यामध्ये सध्या 16 लाख 34 हजार 078 वाहने आहेत.
परिवहन मंडळाची वाहने इतर मालवाहू वाहनांसह बेळगाव आरटीओ व्याप्तीमध्ये 7 लाख 12 हजार 168 नोंदणीकृत वाहने धावत आहेत.
बैलहोंगल आरटीओ व्याप्तीमध्ये 1 लाख 66 हजार 917 वाहने, रामदुर्ग आरटीओ व्याप्तीमध्ये 30 हजार 141 वाहने, चिक्कोडी आरटीओ व्याप्तीमध्ये 3 लाख 89 हजार 100 वाहने, गोकाक आरटीओ व्याप्तीमध्ये 1 लाख 74 हजार 108 वाहने, तर अथणी आरटीओ व्याप्तीमध्ये 1 लाख 61 हजार 644 वाहने आहेत. या पद्धतीने सध्याच्या घडीला बेळगाव जिल्ह्यातील वाहनांची संख्या 16 लाख 34 हजार 78 इतकी आहे.