Tuesday, February 11, 2025

/

रोटरी’ साउथच्या शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाला थाटात प्रारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह :रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथने श्री शिव शस्त्र गाथा या माध्यमातून आयोजित केलेल्या भव्य शिवकालीन शस्त्र प्रदर्शनासह मराठा आरमार व शिवकालीन प्रसंगांवर आधारित रांगोळी प्रदर्शनाचा आज मंगळवारी सकाळी शिवमय वातावरणात शानदार मिरवणुकीने मोठ्या थाटात शुभारंभ झाला.

रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथतर्फे खानापूर रोडवरील रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील मराठा मंदिर येथे सदर शिवकालीन शस्त्र व रांगोळी प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या आज मंगळवारी सकाळी आयोजित उद्घाटन समारंभाच्या प्रारंभी गोवावेस येथील महापालिकेच्या जलतरण तलावापासून प्रदर्शन स्थळापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. अग्रभागी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी असणाऱ्या या मिरवणुकीमध्ये लेझीम पथक, झांज पथक, भगवे निशान धरलेल्या युवती, अश्वस्वार मावळे तसेच शिव रथासह शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी, भगवे फेटे परिधान केलेल्या रोटरीच्या पदाधिकारी, सदस्य आणि हातात भगवे ध्वज धरलेल्या शिवप्रेमींचा मोठा सहभाग होता.

ढोल ताशाच्या दणदणाटात निघालेल्या या जल्लोषपूर्ण मिरवणुकीमुळे संबंधित मार्ग शिवमय झाला होता. मराठा मंदिर येथे भगवे फेटे परिधान केलेल्या रणरागिणी सुहासिनींनी शिवरायांच्या पालखीचे पूजन करून या मिरवणुकीचे स्वागत केले. मिरवणुकीनंतर उद्घाटक मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते प्रदर्शनाचे फीत कापून तसेच दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे सरदार विक्रम सिंह मोहिते, सरदार यशराजे घोरपडे, सरदार मेघराज शिंदे, सरदार ओमकरराजे मालुसरे, शीतलताई मालुसरे, सिद्धार्थ कंक या मान्यवरांसह रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथचे इव्हेंट चेअरमन रो. अशोक नाईक, रोटरी क्लब ऑफ बेळगाव साउथचे अध्यक्ष रो. निलेश पाटील, सेक्रेटरी रो. भूषण मोहिरे आदी उपस्थित होते.

उद्घाटनानंतर प्रसिद्धी माध्यमांसमोर प्रतिक्रिया व्यक्त करताना ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी म्हणाले की या भव्य शस्त्र प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी मला बोलावण्यात आले याचा मला अभिमान आहे आम्ही इतिहासात वाचलेल्या मात्र प्रत्यक्ष न पाहिलेल्या गोष्टी इथे पाहायला मिळाल्या शिवकालीन असंख्य शस्त्रास्त्रे या ठिकाणी मांडण्यात आली आहेत. मराठ्यांसाठी ही अत्यंत गर्वाची बाब आहे. आम्ही आपला पूर्वापार इतिहास अद्याप जतन करून ठेवला आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील शिवकालीन अनेक सरदार घराण्याचा सहभाग आहे.

त्यांच्यासह येथील असंख्य स्वयंसेवकांनी मराठ्यांचा इतिहास अबाधित राखण्याचे जे दायित्व स्वीकारले आहे ती आज येथे पहावयास मिळाले. त्याखेरीज रांगोळी कलाकारांनी रेखाटलेल्या भव्य अशा शिवकालीन रांगोळ्या पाहून नतमस्तक व्हावयास होते. या रांगोळ्या कलाकारांनी 40 -40 तास बसून रेखाटले आहेत हे खरोखरच अभिमानास्पद आहे असे सांगून ब्रिगेडियर मुखर्जी यांनी प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.Weapons exibution

शस्त्र प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवरायांची आणि त्यांच्या शस्त्रांची माहिती देणारे चिंचवड पुणे येथून आलेले चंद्रनील यांनी बेळगावच्या प्रदर्शनाबद्दल माहिती देताना सांगितले की, श्री शिव शस्त्र गाथा या माध्यमातून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर मराठ्यांचा आणि त्यांच्या शस्त्रांचा इतिहास प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडत असतो त्यानुसार आज रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्ही येथे बेळगाव तो मांडत आहोत तोफगोळे, ढाल, चिलखत, नीमच्या, बर्ची अशी विविध प्रकारची शस्त्रे जी मध्यमयुगीन काळात वापरली गेली त्या शस्त्रांसह छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा सैन्यासाठी धोप, तलवार, भाले, गुर्ज साल, विटा अशी जी विविध वैशिष्ट्यपूर्ण शस्त्रे तयार केली ती या प्रदर्शनात मांडण्यात आली आहे. तरी बेळगाव शहरवासी यांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन येथील शस्त्रांची आणि मराठ्यांच्या इतिहासाची माहिती करून घ्यावी, असे आवाहन शेवटी चंद्रनील यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजच्या विद्यार्थ्यांनी विसरू नये. महाराजांच्या इतिहासाची, त्यांच्या गनिमी काव्यांची, दूरदृष्टीची आणि शरीराने बलदंड असलेले त्यांचे सरदार मावळे हे कशाप्रकारे तत्कालीन शस्त्र हाताळत होते याची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना राहावी या उद्देशाने हे शस्त्र प्रदर्शन भरवण्यात आले आहे. प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपतींच्या काळात त्यांच्या सरदार आणि मावळ्यांनी वापरलेली शस्त्रे जी त्यांच्या सध्याच्या वंशजांनी जतन करून ठेवली आहेत ती या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कवड्याची माळ सरदार तानाजी मालुसरे यांना अर्पण केली होती ती बहुमोल कवड्यांची माळ हे देखील या प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे. शिवकालीन अनेक सरदार घराण्याचा या प्रदर्शनात सहभाग आहे. तसेच प्रदर्शनाला लोकमान्य सोसायटी, पीव्हीजी उद्योग समूह पीएनजी उद्योग समूह, बिर्ला स्कूल, चैतन्य इन्स्टिट्यूट, स्मार्ट इन्व्हेस्टमेंटचे सचिन सांबरेकर, श्रीराम सेनेचे सचिन हंगिरकर, उद्योगपती शिरीष गोगटे आदींचे प्रायोजकत्व लाभले आहे.

शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदार आणि मावळ्यांच्या जीवनावर आधारित विविध प्रकारच्या रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवार दि. 14 फेब्रुवारीपर्यंत चालणारे हे प्रदर्शन शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत असणारा असून जनतेसाठी माफक प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.