बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये अलीकडे ऑटो आणि रिक्षांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. बेळगावमध्ये रिक्षा असोसिएशन देखील कार्यरत आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून काही रिक्षाचालकांचा मनमानी कारभार सरसकट सर्वच रिक्षाचालकांचे नाव बदनाम करत असून मनमानी कारभार चालविणाऱ्या अशा रिक्षाचालकांना वेसण घालणे गरजेचे आहे.
आजवर बेळगावमध्ये अनेक जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी, शिष्ट लावण्यासाठी अनेक प्रयत्न केले. नियम, अटी लागू केल्या.परंतु जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासकीय पातळीवरील सर्वच नियमांना, अटींना हरताळ फासण्यात आला. गेल्या शनिवारी बेळगावमध्ये एका कॅब चालकाने क्षुल्लक कारणावरून गोव्याच्या माजी आमदारांना मारहाण केली, त्यात त्यांचा मृत्यू झाला.
यानंतर सोमवारी पुन्हा पी. बी. रोड नजीक ऑटोरिक्षाचालकाचे एका तरुणासहित ज्येष्ठ नागरिकांसोबत भांडण झाले. असे प्रकार शहर परिसरात वारंवार घडत असून रिक्षाचालकांना कडक शिस्त लावणे गरजेचे आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी शालेय रिक्षांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांसाठी नियमावली जाहीर केली. सुरुवातीच्या ७ – ८ दिवसात काटेकोरपणे याची अंमलबजावणी झाली. मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या याप्रमाणेच शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक सुरू झाली. सुरुवातीच्या टप्प्यात कडक अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनाने हळूहळू याकडेही दुर्लक्ष केले. आणि पुन्हा रिक्षातून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी कोंबून घेऊन जाणे फोफावले. रिक्षातून अशापद्धतीने धोकादायक वाहतूक करणाऱ्या रिक्षांचे अपघात होऊनही रिक्षाचालक प्रशासनाच्या कोणत्याही आवाहनाला दाद देत नसल्याचे निदर्शनात आले.
शहर परिसरात रिक्षांची संख्या वाढल्याने रिक्षाचालकांचा मनमानी कारभार देखील वाढला आहे. काही वर्षांपूर्वी प्रत्येक चौकाचौकात, गल्लोगल्ली रिक्षास्थानाक असायचे. त्या त्या ठिकाणी प्रत्येक रिक्षाचालकासाठी नियम असायचे. मात्र अलीकडच्या काळात प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्याकोपऱ्यावर रिक्षा थांबलेल्या दिसून येतात. शिवाय कोणत्याच रिक्षामध्ये मीटर वापरण्यात येत नाही. प्रवासी मिळविण्याच्या नादात अनेक रिक्षाचालक वेगावर नियंत्रण न ठेवता, वाहतुकीचे नियम डावलून रस्त्यावरून इतर वाहनांना धोका पोहोचेल अशा पद्धतीने रिक्षा चालवितात. सर्रास रिक्षाचालक तरुण असल्याचे निदर्शनात येत असून रिक्षामध्ये कर्णकर्कश्शय आवाजात गाणी लावणे, गुटखा, तंबाखू, दारूचे सेवन करणे, मोबाईलवर बोलत रिक्षा चालविणे शिवाय प्रवाशांसोबत उद्धटपणे वर्तन करणे असे प्रकार दिसून येत आहेत.
आतापर्यंत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगावमधील ऑटो-रिक्षाचालकांना शिस्त लावण्याचे प्रयत्न केले, मात्र ते निष्फळ ठरले आहेत. सर्व रिक्षाचालक नियम मोडतात, असे म्हणणे योग्य ठरणार नाही, पण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, हे नक्की. बसस्थानकावर प्रवाशांना आपल्या रिक्षात बसवण्यासाठी सुरू असलेली त्यांची अघोषित स्पर्धा अत्यंत धोकादायक ठरते. या गोंधळावर कोणाचेच नियंत्रण नाही. परिवहन मंडळ, प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग आणि अगदी पोलिसही या परिस्थितीसमोर हतबल असल्याचे वारंवार दिसून येते. मात्र अशा काही रिक्षाचालकांमुळे प्रामाणिकपणे रिक्षासेवा देणाऱ्या रिक्षाचालकांसमोरही समस्या उभ्या राहात आहेत.
रिक्षाचालकांसाठी उदरनिर्वाहाच्या दृष्टीने वाहन चालवणे आवश्यक आहे, हे निश्चितच मान्य करता येईल. मात्र, त्यासाठी होणारी मनमानी कोणत्याही परिस्थितीत कायमस्वरूपी सहन केली जाणार नाही, हे त्यांनी लक्षात घेतले पाहिजे. मीटरची सक्ती लागू होताच प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या रिक्षाचालकांनी आणि त्यांच्या संघटनेच्या नेत्यांनी संयम बाळगण्याचा सल्ला द्यायला हवा. तसेच, पोलीस दलानेही त्यांची मनमानी रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. बेळगावमधील रिक्षाचालकांची जी प्रतिमा सध्या मालिन झाली आहे ती सुधारण्यासाठी रिक्षाचालकांनीच पुढाकार घेणे गरजेचे आहे.