बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा पोलिसांनी प्रभावी कारवाई करत रियल इस्टेट व्यावसायिक बसवराज अंबी यांची सुखरूप सुटका केली असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी परिसरात एका रियल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून बसवराज अंबी यांची सुखरूप सुटका केली.
बेळगावचे पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसवराज अंबी यांना निपाणीच्या उपनगरात एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आले होते. घटप्रभा आणि निपाणी पोलिसांच्या जलद कारवाईमुळे अपहरणकर्त्यांना अटक करण्यात यश आले.
यापकरणी ईश्वर रामगणट्टी, सचिन कांबळे, रमेश कांबळे आणि राघवेंद्र मरापुरा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यात अद्याप काही जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून, त्यांचा शोध सुरू आहे.
प्राथमिक तपासानुसार बसवराज अंबी हे बेकायदेशीर व्यवहारात गुंतले असल्याचा संशय आरोपींना होता. बसवराज पोलिसांकडे जाणार नाहीत आणि त्यामुळे खंडणीसाठी ते सहज लक्ष्य ठरतील असा समज आरोपींचा होता. सुरुवातीला आरोपींनी बसवराज यांच्या कुटुंबाकडे तब्बल 5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती.
मात्र, नंतर त्यांच्या मुलाला 10 लाख रुपये ठरलेल्या जागी आणण्यास सांगण्यात आले. परंतु, मुलासोबत आणखी काही जण आल्याचे पाहून आरोपींनी तिथून पळ काढला. त्यानंतर कुटुंबाला पुन्हा धमकी देण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात 24 तासांच्या आत चौघांना अटक केली असून, पीडिताच्या पत्नीकडून तक्रार दाखल होताच तत्काळ कारवाई करण्यात आली. अपहरणकर्त्यांचा आणि बसवराज यांचा पूर्वी कोणताही संबंध नव्हता. मात्र, पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे आरोपींना लवकरच अटक करण्यात आली, असे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सांगितले.
या प्रकरणात आणखी काही जण सामील असल्याचा पोलिसांचा संशय असून, त्यांचा शोध सुरू आहे. बेळगाव पोलिसांनी जलद कारवाई करत अपहरण झालेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका केल्याने त्यांच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले जात आहे.