बेळगाव लाईव्ह: पंत बाळेकुंद्री येथे बस कंडक्टर आणि प्रवाशांत झालेल्या वादाला भाषिक वादाचा रंग देण्यात आला असून कन्नड संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर आणि परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मंगळवारी सकाळी 9:00 वाजल्यापासूनच कित्तूर राणी चन्नम्मा चौकात तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.
बस कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात झालेल्या वादाला निव्वळ राजकारणाच्या हेतूसाठी भाषिक रंग देण्याचा प्रयत्न कन्नड संघटनांच्या वतीने करण्यात येत असून याप्रकरणी पुन्हा एकदा मराठी भाषिकांना टार्गेट करण्याचे कारस्थान कन्नड संघटनांनी चालविली आहे.
याप्रकरणी दोषी असणाऱ्या बस कंडक्टरवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तरीही कन्नड संघटनांच्या मूठभर कार्यकर्त्यांकडून घटनेची शहानिशा न करता निव्वळ राजकारण आणि मराठी द्वेषापोटी सीमा भागाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
कन्नड संघटनांच्या या वृत्तीमुळे सीमाभागातील कायदा आणि सुव्यवस्था देखील बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असून या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आल्याने राणी कित्तूर चन्नम्मा चौकात पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.