बेळगाव लाईव्ह : विकासाच्या दिशेने झेपावणाऱ्या बेळगाव शहरात गेल्या काही वर्षात मोठ्या संख्येने विमानफेऱ्यांमध्ये वाढ झाली. विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनीही बेळगावकरांना मोठी साथ दिली.
परंतु अचानक अनेक विमान कंपन्यांनी बेळगावकडे पाठ फिरवली त्यातच बेळगावमधील अनेक प्रकल्प हुबळी – धारवाडला स्थलांतरित झाल्यामुळे याचा परिणाम बेळगावच्या विविध क्षेत्रांवर दिसून येत आहे. परिणामी लागोपाठ अनेक विमान कंपन्यांनी बेळगाव सांबरा विमानतळावरून काढता पाय घेतल्याने विमानप्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांची गैरसोय झाली.
असे असले तरीही गेल्या वर्षभरात तब्बल 3 लाख 47 हजार प्रवाशांनी विमानप्रवास केल्याची नोंद करण्यात आल्याने बेळगावचे महत्त्व पुन्हा एकदा वाढले आहे.
विमान फेऱ्या, विमान सेवा आणि विमान सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचा तुटवडा अशी परिस्थिती असूनही गेल्या वर्षभरात प्रवाशांनी केलेला विमानप्रवासाचा आकडा पाहता सांबरा विमानतळावर विमानसेवा वाढविण्याची गरज असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
सध्या इंडिगो व स्टार एअर या दोनच कंपन्या देशातील महत्त्वाच्या शहरांना विमानसेवा देत आहेत. प्रादेशिक हवाई वाहतूक केंद्र म्हणून सांबरा विमानतळाने आपली छाप पाडली आहे. विमानाचे तिकिट आवाक्यात आल्याने गेल्या काही वर्षांमध्ये देशातील हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. सांबरा विमानतळही त्याला अपवाद राहिलेले नाही. गेल्या वर्षभरात या विमानतळावरुन ३ लाख ४७ हजार प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. तर ५,५९१ विमानांनी उड्डाण केले आहे. तसेच कार्गो सेवेंतर्गत २७ टन मालवाहतूक झाली आहे. बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यासोबतच बेळगावमधून कार्गो वाहतूकही सुरू आहे.
बेळगावमधून अनेक मौल्यवान वस्तू, पार्सल, पत्र तसेच औद्योगिक कारखान्यांमधील स्पेअरपार्ट यांची वाहतूक विमानाने केली जात आहे. मागील वर्षात 27.3 मेट्रिक टन कार्गो वाहतूक झाली आहे. त्यामुळे कार्गो वाहतुकीसाठी बेळगाव विमानतळ भविष्यात महत्त्वाचे ठरणार आहे. हवाई वाहतूक खात्याच्या आकडेवारीनुसार डिसेंबर मध्ये २०२४ विमानतळावरील प्रवासी वाहतुकीत कमालीची वाढ झाली. तब्बल २९,०८० प्रवाशांनी विमानतळावरुन प्रवास केला होता. तर ४४२ विमानांनी उड्डाण केले. नॉव्हेबर महिन्याच्या तुलनेत त्यात १९.५६ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले. सांबरा विमानतळावरुन इंडियन एअरलाइन्स, इंडिगो, स्टार एअर आदी कंपन्या सेवा पुरवित आहेत.
बेळगाव-बेंगळूर या सकाळच्या विमानफेरीमुळे प्रवासी संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. यामध्ये कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन, काँग्रेस अधिवेशन यामुळे विमानांची वाहतूक वाढली. प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी हे कामानिमित्त बेळगावला ये-जा करीत असल्याने विमानाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण वर्षात 5 हजार 591 विमानांनी बेळगावमध्ये ये-जा केली आहे. सध्या बेंगळूर, दिल्ली, हैद्राबाद या शहरांना इंडिगो एअरलाईन्स तर अहमदाबाद, मुंबई, नागपूर, जयपूर व तिरुपती या शहरांना स्टार एअर सेवा देत आहे.
उडाण योजने अंतर्गत सुरु असलेल्या विमानसेवेदरम्यान बेळगावच्या विमानफेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन सांबरा विमानतळाचे नाव अधिकाधिक विमान वाहतूक करणाऱ्या विमानतळांमध्ये समाविष्ट झाले होते.
मात्र लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आणि विमान कंपन्यांनी फिरवलेली पाठ यामुळे गेल्या दोन वर्षात सांबरा विमानतळ पुन्हा पिछाडीवर पडले आहे. गेल्या वर्षभरातील विमान प्रवासाचा आकडा पाहता भविष्यात पुन्हा एकदा सांबरा विमानतळावरून देश – विदेशातील शहरांना जोडणाऱ्या विमानसेवा सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी वाढू लागली आहे. प्रवाशांची वाढलेली संख्या लक्षात घेता आता केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाला विमानफेऱ्या वाढविण्याचा विचार करावा लागेल.