बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्या बसगाड्यांची भर पडली आहे. प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे बससेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला असून, १५ नव्या बसेसपैकी १० बसेस आधीच दाखल झाल्या असून उर्वरित बसेस देखील लवकरच सेवेत येणार आहेत.
बेळगाव शहरात दररोज सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत एकूण १४० बसेस धावत असतात. या माध्यमातून सुमारे ८० हजार ते १ लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. शहर सेवेसाठी टाटा कंपनीच्या बीएस-६ दर्जाच्या बसेसची निवड करण्यात आली आहे. सहा महिन्यांपूर्वी प्रायोगिक तत्वावर चार बसेस सेवेत आणल्या गेल्या होत्या. त्यानंतर आता आणखी १५ मिनी बसेस डिझेलवर उपलब्ध झाल्या आहेत.
बेळगाव शहराच्या वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेता अजून १०० ते १५० बसेसची गरज असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, इलेक्ट्रीक बसेसचा पर्यायही विचाराधीन आहे. इलेक्ट्रीक बसेस एकदा चार्ज केल्यानंतर २५० ते ३०० किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतात. यामुळे इंधन खर्चात मोठी बचत होणार आहे. चार्जिंग पाँईट शहरातील विविध ठिकाणी बसविण्यात येत असून, भविष्यात अधिकाधिक इलेक्ट्रीक बसेस सेवेत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बेळगावच्या प्रवाशांसाठी अधिक सोयीस्कर आणि परवडणारी बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध योजना राबविण्यात येत आहेत. पुढील काही आठवड्यांत उर्वरित बसेस सेवेत दाखल होण्याची अपेक्षा असून, भविष्यात इलेक्ट्रीक बसेसचा ताफा वाढविण्यावर भर दिला जाणार आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.