बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील नंदगड येथे तब्बल 24 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रेला आज बुधवार सकाळपासून हजारो भाविकांच्या उपस्थितीत अपूर्व उत्साह अन् हर्षोल्हासात भक्तीभावाने प्रारंभ झाला आहे.
नंदगड (ता. खानापूर) येथील ग्रामदैवत श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेचा शुभारंभ आज बुधवारी सकाळी अक्षतारोपण अर्थात देवीच्या विवाह सोहळ्याने झाला. प्रारंभी आज पहाटे 3 ते सकाळी 7 वाजेपर्यंत होम, अभिषेक वगैरे धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर सूर्योदयाला ब्रह्ममुहूर्तावर सकाळी 7 वाजून 11 मिनिटांनी अक्षतारोपण कार्यक्रम अत्यंत धार्मिक वातावरणात पार पडला.
याप्रसंगी नंदगड यात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष सुभाष पाटील, सेक्रेटरी हणमंत पाटील, सुधीर कब्बूर, उपाध्यक्ष राजेंद्र कब्बूर, खेमानी पाटील, वल्लभ गुणाजी, सतीश मादर, कार्याध्यक्ष नागेंद्र पाटील, प्रमोद पाटील, राजू पाटील, प्रसाद पाटील, आर्थिक कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार अरविंद पाटील, दीपक पाटील, विनायक पाटील, सुहास कुंद्री, गणपती पाटील, यल्लाप्पा गुंडांनी, गजानन चव्हाण, अनिल सुतार, शंकर सोनवणे, रोहित गुरव, अशोक गोरे आदिंसह हजारो भाविक उपस्थित होते. अक्षतारोपण कार्यक्रमानंतर सध्या देवीला सवाद्य मिरवणुकीने गावात फिरवण्यात येत असून मानाच्या मंदिरांना भेटी दिल्या जात आहेत. शेकडो भाविकांचा उत्साहपूर्ण सहभाग असणाऱ्या या मिरवणुकीच्या माध्यमातून आज दिवसभर मानाप्रमाणे प्रत्येक गल्लीत ओट्या स्वीकारण्यात येणार आहेत. सदर यात्रोत्सव आजपासून सलग 12 दिवस म्हणजे येत्या 23 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
यात्रेसंदर्भात बेळगाव लाईव्हला माहिती देताना नंदगड यात्रा उत्सव समितीच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, गेल्या 24 वर्षानंतर आज आमची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीचा विवाह सोहळा संपन्न झाला असून तिच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. ही यात्रा येत्या 23 फेब्रुवारीपर्यंत हर्षोल्हासात भक्तिभावाने साजरी होणार आहे. काल मंगळवारी रात्रीपासून देवीच्या विवाहाची तयारी सुरू झाली होती आणि त्यासंबंधीचे होम वगैरे धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर आज बुधवारी ब्रह्म मुहूर्तावर सकाळी 7:11 वाजता देवीचा विवाह सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी नंदगड पंचकमिटीसह यात्रोत्सव कमिटीच्या पदाधिकारी सदस्यांसह नंदगड व स्थानिक पंचक्रोशीतील भाविकांसह बेळगाव, गोवा आणि महाराष्ट्रातील भाविक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. आजपासून सतत तीन दिवस श्री महालक्ष्मी देवी गावात फिरून मानकर यांच्या आणि गावकऱ्यांच्या ओट्या स्वीकारणार आहे. त्यानंतर शनिवारी 15 फेब्रुवारी रोजी देवी रथावर आरुढ होणार असून त्या रात्री कामाण्णा खुटावर वस्तीला राहणार आहे.
तसेच रविवारी दुपारी ठीक एक वाजता देवी पुन्हा रथावर आरुढ होऊन गदगेच्या ठिकाणी पोहोचणार आहे. तेथे धार्मिक विधी होऊन श्री महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान होणार आहे. देवी गदगेवर विराजमान होताच खऱ्या अर्थाने या यात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. आमच्या यात्रा कमिटीकडून उभारण्यात आलेली अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती हे यात्रेचे मुख्य आकर्षण असणार आहे. तरी ज्यांना अयोध्येला जाऊन मूळ श्रीराम मंदिराला भेट देणे शक्य नाही अशा परगावच्या भाविकांनी नंदगड येथे श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त उभारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराला जरूर भेट द्यावी लागेल आणि नंदगडवासियांच्या पाहुणाचाराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संबंधित पदाधिकाऱ्याने नंदगड यात्रा उत्सव समिती आणि उपसमित्यांच्यावतीने केले.
तसेच यात्रोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी यात्रोत्सव कमिटी व पोलिसांकडून बाहेरून येणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने परगावहून येणाऱ्या भाविकांच्या या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था गावाच्या तीनही वेशीबाहेर करण्यात आली आहे. तरी समस्त भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असेही त्यांनी सांगितले.
माजी आमदार अरविंद पाटील यांनी नंदगड येथील श्री महालक्ष्मी यात्रेची आज अक्षतारोपणाने सुरुवात झाली असून ठरल्यानुसार वेळेवर शिस्तबद्ध नियोजनपूर्वक यात्रेचा शुभारंभ झाला असल्याचे सांगितले. सध्या देवी गावात फिरू लागली असून विधी विधानानुसार ठरलेल्या जागी ओटी घेण्याचा कार्यक्रम सुरू आहे.
सदर यात्रोत्सव आजपासून सलग बारा दिवस उत्साहात चालणारा असून आजच्या अक्षरतारोपणाप्रसंगी भावीक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. भाविकांचा हाच प्रतिसाद यात्रेच्या पुढील दिवसांमध्ये देखील कायम राहणार राहणार आहे असे सांगून आजच्या अक्षतारोपण कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल अरविंद पाटील यांनी भाविकांना धन्यवाद दिले.