बेळगाव लाईव्ह : बुधवारी अक्षतारोपण झाल्यानंतर चार दिवस रथात विराजमान होऊन अति उत्साहात गावभर मिरवणूकीने फिरणारी श्री महालक्ष्मी आज सायंकाळी ठीक चार वाजता नंदगड येथील गदगेवर तयार केलेल्या श्रीराम मंदिरात विराजमान होणार आहे.
चार दिवसांपासून हजारो भाविकांच्या उपस्थितित सुरू असलेल्या श्री महालक्ष्मी च्या रथोत्सवात महिला भरजरी वस्त्रालंकार नेसून आवर्जून सहभागी झाल्या होत्या.
गावभर देवीदेवतांना गाऱ्हाणे घालून विधिवत पूजा अर्चा करत देवी गल्लोगल्ली भाविकांना दर्शन देत होती, त्यामध्ये भाविकांनी आपल्या घरासमोर देवीची ओटी भरून भव्य स्वागत केले.
या संपूर्ण रथोत्सवात ग्रामस्थांनी भगवे तसेच विविध रंगाचे फेटे व पोशाख परिधान करून ढोलताशांच्या गजरात नृत्यावर ठेका धरला होता या मध्ये महिलांनीही या नृत्यामध्ये सहभागी होऊन आनंद द्विगुणित केला.
आज या अभूतपूर्व आशा चाललेल्या रथोत्सवाची सांगता होणार असून परंपरेप्रमाणे श्रीमहालक्ष्मी ठीक चार वाजता गदगेवर विराजमान होणार आहे, या गदगेवर श्रीमहालक्ष्मीसाठी अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारण्यात आले असून भाविकांसाठी हे खास आकर्षण आहे.