बेळगाव लाईव्ह :उत्कर्ष साधायचा असल्यास भावनात्मक असून चालत नाही तुमच्या विचारात जागरूकता हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केले. त्यांचा आदर्श घेऊन आपण आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी मार्गक्रमण केले पाहिजे. मराठा समाजाला संघटित करावयाचे असेल तर सर्वप्रथम एक प्रणाली निर्माण करायला हवी, असे मत धारवाडचे पालकमंत्री संतोष लाड यांनी व्यक्त केले.
बेळगाव भागातील मराठा बांधवांना संघटित करण्याच्या उद्देशाने विचारविमर्श करण्यासाठी कॅम्प येथील मेसाॅनिक हॉल येथे आज मंगळवारी आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. मंत्री संतोष लाड म्हणाले की, आपल्या समाजासाठी वेळ देऊ इच्छिणाऱ्यांनीच अशा कार्यक्रमांना आले पाहिजे. ज्यांना तो वेळ देता येत नाही त्यांनी येऊ नये हे प्रथम सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. त्रास, समस्या सर्वांनाच असतात, मात्र त्यांना कांही काळ बाजूला सारून आपण आपल्या समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य करण्याकरिता वेळ काढला पाहिजे. सुदैवाने आपला बेळगाव जिल्ह्यातील मराठा समाज राज्यातील इतर समाजाच्या तुलनेत बराच चांगल्या स्थितीत आहे.
समाजाच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी सर्वांनी भेदभाव विसरून राजकारण बाजूला सारून संघटित झाले पाहिजे. प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असते. मात्र चांगल्या विचारधारेचे आपण स्वागत केले पाहिजे. त्यामुळेच मी आज राजकारणामध्ये आणि समाजकारणात देखील आहे. संभाव्यतेपेक्षा मोठे काय आहे? याचा विचार करायला हवा. मराठा समाजाला संघटित करावयाचे असेल तर सर्वप्रथम एक प्रणाली निर्माण करायला हवी. त्यासाठी प्रथम कार्यालयाची निर्मिती करून विविध समित्यांची नियुक्ती करण्याद्वारे शैक्षणिक, जनजागृती वगैरे उपक्रम राबवले गेले पाहिजेत. मात्र प्रथम कार्यालय उभे राहिले पाहिजे.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावनेच्या भरात बोलू नका. भावनात्मक बोलत राहिल्यामुळेच आपण मागे पडलो आहोत. राजकारण हा समाजाचा अविभाज्य भाग आहे. पुढे जायचे असल्यास भावनात्मक असून चालत नाही, तुमच्या विचारात जागरूकता हवी. आज छत्रपती महाराजांचा इतिहास तुम्हालाच माहित नाही. छत्रपतींच्या नावाने तुमचा गैरवापर केला जात आहे. हिंदू धर्माने जगाला जगण्याची पद्धत शिकवली. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केले. त्यांचा आदर्श घेऊन आपण आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी मार्गक्रमण केले पाहिजे, असे धारवाडचे पालकमंत्री संतोष लाड यांनी स्पष्ट केले केले. यावेळी त्यांनी आजच्या बैठकीतील लक्षणीय उपस्थितीबद्दल महिलावर्गाचे खास अभिनंदन केले.
याप्रसंगी डॉ. मिलिंद हलगेकर, निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीस या कार्यक्रमासाठी मिलिंद भातकांडे, श्रीकांत कदम -जाधव, जयराज हलगेकर, अरुण माने, बापू सूर्यवंशी, गणेश हलगेकर, शिवाजी पाटील यांच्यासह विविध संस्थांचे सदस्य, महिला व मराठा बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.