बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने आज मुंबई दौरा करून महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सावंत यांच्यासोबत चर्चा केली. या दौऱ्यात समितीने निपाणी सीमाभागात रोजगार मेळावा घेण्याची मागणी केली.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा खटला 2004 पासून प्रलंबित असल्यामुळे या सीमाभागातील तरुणांमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे येथील तरुण वर्ग रोजगाराच्या संधीसाठी संघर्ष करत आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने दोन वर्षांपूर्वी सीमाभागातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी देण्यासाठी कार्य केले होते, ज्यात 1700 तरुणांना रोजगार मिळवून देण्यात यश मिळाले होते. मात्र, काही अपरिहार्य कारणांमुळे मागील काही काळात रोजगार मेळावा घेता आला नाही. यामुळे संघटनेने यंदा महाराष्ट्र सरकारकडे एकत्रितपणे रोजगार मेळावा घेण्याची मागणी केली.
4 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईत उद्योग मंत्री उदय सावंत यांच्यासोबत बैठक पार झाली. या बैठकीत निपाणी सीमाभागातील रोजगार मेळावा घेण्यासाठी निवेदन देण्यात आले. अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील यांनी या बैठकीत बोलताना सांगितले की, मागील रोजगार मेळाव्यात सीमाभागातील तरुणांसाठी दरवर्षी रोजगार मेळावा घेण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन महाराष्ट्र सरकारने पाळावे, अशी विनंती यावेळी करण्यात आली.
निवेदन स्वीकारून युवा समिती शिष्टमंडळासोबत चर्चा करताना उद्योग मंत्री उदय सावंत यांनी यावर लवकरच हालचाली करण्याचे आश्वासन दिले. तसेच यासंदर्भात लवकरच पुन्हा एका बैठकीचे आयोजन केले जाईल, असे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे निपाणी विभाग अध्यक्ष जयराम मिरजकर, अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, कपिल बेलवळे आणि अमर विटे उपस्थित होते.