बेळगाव लाईव्ह : बेळगाव गोवा महामार्ग अडवत रास्ता रोको केल्याने अखेर हेस्कॉमला जाग आली असून वाघवडे, संतीबस्तवाड गावातील विजेची समस्या सोडवण्याचे आश्वासन मिळाले आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या संयुक्त विद्यमातून मंगळवारी मच्छे हेस्कॉम विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
वाघवडे, संतीबस्तवाड सह अन्य गावातील विज समस्येविरोधात मच्छेतील हेस्कॉम कार्यालयासमोर रास्ता रोको करुन बेळगाव-गोवा महामार्ग तीन तास अडवून धरल्यामुळे अखेर हेस्कॉमला जाग आली. त्यामुळे हेस्कॉमने सलग सात तास थ्री फेज तर रात्रभर सिंगल फेज वीजपुरवठा करण्याची ग्वाही दिली.
संतीबस्तवाड, बाळगमट्टी, वाघवडे, झाडशहापूर परिसरात शेतातील घरांना रात्री वीजपुरवठा केला जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सलग सात तास थ्री फेज वीजपुरवठा करावा. तसेच शेतातील घरांसाठी रात्री 6 ते सकाळी 6 या कालावधीत सिंगल फेज वीजपुरवठा करावा, अशी शेतकर्यांची मागणी करत हेस्कॉमला निवेदन दिले होते. पण, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मंगळवारी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन केले.
मच्छे येथील हेस्कॉम कार्यालयासमोर शेतकरी आणि समिती नेत्यांनी दोन तास धरणे धरले. माजी ए पी एम सी सदस्य आर. के. पाटील, माजी आमदार मनोहर किणेकर, रमाकांत कोंडुसकर यांनी हेस्कॉमच्या कारभारावर ताशेरे ओढत सडकून टीका केली हेस्कॉम अधिकार्यांनी निर्णय न घेतल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला.
त्यानुसार एक वाजता रास्ता रोको केला. त्यामुळे हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता विनोद केरुर यांनी आंदोलनस्थळी येऊन शेतकर्यांशी चर्चा केली. सात तास थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. रात्रभर सिंगल फेज वीज देण्यात येईल, असेही सांगितले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी समिती नेते आर. एम. चौगुले, युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणयेकर, अॅड. प्रसाद सडेकर, अनिल पाटील, दत्ता उघाडे, मोनाप्पा पाटील, महेश जुवेकर, जोतिबा आंबोळकर व शेतकरी उपस्थित होते.